- प्रवीण जंजाळकन्नड : कन्नड - सोयगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव अशी तिरंगी लढत होणार असून, जाधव दाम्पत्य पहिल्यांदाच एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख केतन काजे यांच्यासह राष्ट्रवादीचे माजी आमदार नितीन पाटील, संतोष कोल्हे, स्वाती कोल्हे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता जाधव यांची उद्धव सेनेचे विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत यांच्या सोबत लढत होणार असली तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हेही निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक चर्चेची झाली आहे.
जाधव दाम्पत्यापैकी कोणाला यश मिळते, की उद्धव सेनेचे आमदार उदयसिंग राजपूत हे आपली जागा कायम ठेवतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. येथे मनसेने लखन चव्हाण यांना निवडणूक रिंगणात उतरवल्याने ते मनसेला किती मते मिळवून देतात, याकडे पक्ष कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर माजी आमदार नितीन पाटील, स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, केतन काजे यांनी माघार घेतली असली तरी ते प्रचारात किती सक्रिय राहतात, यावर संजना जाधव यांच्या विजयाचे बरेच गणित अवलंबून आहे. या विधानसभा मतदारसंघात आता महायुती, महाविकास आघाडीसह एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
निवडणूक रिंगणातील उमेदवार:१) उदयसिंग सरदारसिंग राजपूत (महाविकास आघाडी), २) संजना उर्फ रंजनाताई हर्षवर्धन जाधव (महायुती), ३) लखन रोहिदास चव्हाण (मनसे), ४) आयास मकबूल शाह (वंचित बहुजन आघाडी), ५) डॉ विकास राजे काशिनाथ बरवंडे (हिंदू समाज पार्टी), ६) हयास मोईनुद्दीन सय्यद (जनहित लोकशाही पार्टी), ७) रंजना पिंटू जाधव (बहुजन समाज पार्टी), ८) हर्षवर्धन रायभान जाधव (अपक्ष), ९) संगीता गणेश जाधव (अपक्ष), १०) मनोज केशवराव पवार (अपक्ष), ११) अ जावेद अ वाहेद अब्दुल (अपक्ष), १२)सईद अहमद खा अब्दुल रशीद खान पठाण (अपक्ष), १३) वैभव रमेश भंडारे (अपक्ष), १४) विठ्ठलराव नारायणराव थोरात (अपक्ष), १५) युवराज रावसाहेब बोरसे (अपक्ष), १६) मनीषा सुभाष राठोड (अपक्ष)