वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर परिसरातील छत्रपतीनगरात रविवारी (दि.२१) आयोजित नेत्र तपासणी शिबिरात ११० रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. बजाज सृष्टी व व्हिजन स्प्रिंग यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
--------------------------------
पारिजातनगरात विजेचा लंपडाव
वाळूज महानगर : म्हाडा कॉलनी परिसरातील पारिजातनगरात विजेचा सतत लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या कामगार वसाहतीतील वीजपुरवठा दिवसातून अनेकदा खंडित केला जात असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. नळाला पाणी आल्यानंतर वीज गायब होत असल्याने विद्युत मोटारी सुरू करता येत नसल्याने पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.
---------------------------------
वाळूजला आज शेतकऱ्यांची बैठक
वाळूज महानगर : वाळूज येथे मंगळवारी (दि.२३) दुपारी ४ वाजता माजी आ. हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, पीकविम्याचा लाभ द्यावा तसेच कृषीपंपाची वीजबिले माफ करण्यात यावी, यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचे महेश गुजर, विठ्ठल कुंजर, भाऊसाहेब शेळके, किशोर परभणे यांनी कळविले आहे.
--------------------------
खाम नदीवरील पूल बनला धोकादायक
वाळूज महानगर : पाटोदा येथील खाम नदीवरील पूल जर्जर झाल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. बजाज गेट ते वाल्मी रोड रस्त्यावर खाम नदीवरील हा पूल जुनाट झाला असून पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. येथून जड वाहनांची मोठी वर्दळ असल्याने गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धोकादायक पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने वाहनधारकात नाराजीचा सूर उमटत आहे.
----------------------
लायननगर फाट्यावर रहदारीस अडथळा
वाळूज महानगर : वाळूजच्या लायननगर फाट्यावर मासेविक्रेते रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसत असल्यामुळे रहदारीस अडथळा होतो. या फाट्यावर मच्छी मार्केटमध्ये खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होते. रस्त्याच्या कडेला मासेविक्री करणाऱ्याविरुध्द कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
---------------------------------
अजवानगरातून दुचाकी लंपास
वाळूज महानगर : वाळूजच्या अजवानगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिंद चंद्रभान खिल्लारे (रा. अजवानगर) यांनी २० फेब्रुवारीला रात्री आपली दुचाकी घरासमोर उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
--------------------------
बजाजनगरात वृक्षारोपण कार्यक्रम
वाळूज महानगर : संत निरंकारी मंडळाच्या वतीने बजाजनगरात रविवारी (दि.२१) वृक्षारोपण करण्यात आले. सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सारा संगम परिसर व भोंडवे पाटील स्कूल या ठिकाणी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. कार्यक्रमाला उद्योजक हनुमान भोंडवे, तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, वाळूज महानगर बजाजनगर निरंकारी मंडळाचे शिवाजी कुबडे, संत निरंकारी सेवादल तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
------------------------