औरंगाबाद : अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये नेत्रदान बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीचे नेत्रदान केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान करू नये, असे पत्र संबंधित व्यक्तीने लिहून ठेवले असेल तरच नेत्रदान टळते. अंध व्यक्तींची संख्या पाहता भारतातही मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीचे नेत्रदान करण्याचा विचार होण्याची गरज असल्याचा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.महाराष्ट्र आॅप्थेल्मोलॉजिकल सोसायटी, मराठवाडा आॅप्थेल्मोलॉजिकल सोसायटी आणि औरंगाबाद आॅप्थेल्मोलॉजिकल असोसिएशनच्या वतीने एमजीएम येथील रुख्मिणी सभागृहात आयोजित नेत्ररोग तज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेचा रविवारी समारोप झाला. परिषदेत देश-विदेशांतील नेत्रतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. जगभराच्या तुलनेत २५ टक्के अंध भारतात आहेत. त्यामुळे नेत्रदानासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली जाते. भारतात नेत्रदान हे ऐच्छिक म्हणजे व्यक्ती आणि मृत्यूनंतर कुटुंबाच्या संमतीने होते. परंतु अनेक देशांत नेत्रदान हे बंधनकारक आहे. भारतात ज्येष्ठ व्यक्तींच्या नेत्रदानाचे प्रमाण अधिक आहे. परंतु अनेकदा असे नेत्र फारसे उपयोगी ठरत नसल्याची चिंताही तज्ज्ञांनी व्यक्त केली.परिषदेत १२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांचे परिषदेत थेट प्रक्षेपणही करण्यात आले. परिषद यशस्वीतेसाठी आयोजन समितीच्या प्रमुख डॉ. सुनयना मलिक, सचिव डॉ. राजीव मुंदडा, वैज्ञानिक समिती प्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर जोशी, कोषाध्यक्ष डॉ. धनंजय मावरे, औरंगाबाद नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील कसबेकर, सचिव डॉ. अनंत पिंपरकर, कोषाध्यक्ष डॉ. केदार नेमीवंत आदींनी प्रयत्न केले.नवे तंत्रज्ञान आत्मसातराज्यभरातून तेराशेपेक्षा अधिक तज्ज्ञांनी परिषदेत सहभाग नोंदविला. ४० वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे. त्यानंतर अनेक नवीन तंत्रज्ञान आलेले आहे. परिषदेच्या माध्यमातून माझ्यासह प्रत्येक सहभागी डॉक्टरांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता आले, असे आयोजन समितीच्या प्रमुख डॉ. सुनयना मलिक म्हणाल्या.गुणवत्तापूर्ण उपचारकमी शुल्कात रुग्णांना गुणवत्तापूर्ण उपचार देण्याच्या दृष्टीने परिषद महत्त्वपूर्ण ठरली. मराठवाड्यातील नेत्ररुग्णांना याचा आगामी कालावधीत नक्कीच फायदा होईल, असे डॉ. राजीव मुंदडा म्हणाले.
जगातील अनेक देशांत नेत्रदान बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:09 PM
अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये नेत्रदान बंधनकारक केलेले आहे. प्रत्येक मृत व्यक्तीचे नेत्रदान केले जाते. मृत्यूनंतर नेत्रदान करू नये, असे पत्र संबंधित व्यक्तीने लिहून ठेवले असेल तरच नेत्रदान टळते.
ठळक मुद्देभारतातही व्हावा विचार : नेत्रतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेचा समारोप