लॉकडाऊन काळाचा सदुपयोग : तोकडी यंत्रणा असूनही शिक्षक, ग्रामस्थांचा पुढाकार; रिक्त पदे भरण्याची गरज
सुनील घोडके
खुलताबाद : कोरोना काळात अनेक क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. विशेष करून शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे बोलले जाते. एकीकडे ही भयावह परिस्थिती असली तरी खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी लॉकडाऊन काळाचा सदुपयोग करून शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. तालुक्यातील ११० पैकी ७० शाळेचे रुपडे पालटले असून, सुंदर सजावट झालेली शाळा आता विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहे.
तालुक्यात खासगी व इंग्रजी शाळेच्या तुलनेत आजही जिल्हा परिषद शाळा दर्जेदार शिक्षण देणाऱ्या असल्या तरी ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या पाल्यांना या शाळेत टाकण्यास तयार नाहीत. जि. प. शाळा म्हणजे गरिबांची शाळा असाच समज लोकांत पसरला आहे. दुसरीकडे इंग्रजी माध्यम व खासगी शाळांच्या स्पर्धेत या शाळा तग धरून आजही कायम आहेत. त्यामुळेच शिक्षक शासनाचा कोणताही अभिनव उपक्रम असेल तो शिरसावंद्य मानून पूर्णत्वास नेतो. त्यामुळे शिक्षण विभागाला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शाळांची रिक्त पदे भरून उभारी देण्याची गरज आहे.
----
शाळातील भिंती झाल्या बोलक्या
विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी मराठवाड्यात सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविले. त्याच धर्तीवर खुलताबाद गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी यांनी तालुक्यात ‘सुंदर माझी शाळा’ हे अभियान राबवून आमूलाग्र बदल केला. त्यामुळे ७० शाळांना आकर्षक रंगरंगोटी करून सुंदर करण्यात आल्या. शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. अनेक शिक्षकांनी पदरचे पैसे खर्च करून सुंदर माझी शाळा उपक्रमात सहभाग घेतला, तर काही ठिकाणी ग्रामस्थांनीही आर्थिक मदत केल्याने शाळांचे रुपडे पालटले आहे.
----
पाच वर्षांपासून सहा केंद्रांना नाही प्रमुख
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जि. प. शाळा अद्याप म्हणाव्या तशा सुरू झाल्या नाहीत. खुलताबाद तालुक्यात १११ जिल्हा परिषद शाळा असून, यात ४ उच्च माध्यमिक आहेत. या सर्व शाळांवर ज्यांचे नियंत्रण असते. त्या सात केंद्रप्रमुखांपैकी बाजार सावगी, गल्लेबोरगाव, वेरूळ, सुलतानपूर, गदाणा, बोडखा या सहा केंद्रप्रमुखांची पदे गेल्या पाच वर्षांपासून रिक्तच आहे.
----
५ मुख्याध्यापक, ४२ शिक्षकांची पदे रिक्त
तालुक्यातील ३३ मुख्याध्यापक पदांपैकी ५ पदे रिक्त आहेत. पदवीधर शिक्षकांच्या १३२ मंजूर पदांपैकी २६, तर सहशिक्षकांच्या ३३१ पदापैकी १६ पदे रिक्त आहेत, तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिपायांची दोन पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर शालेय पोषण अधीक्षकाचे पद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याची अतिरिक्त जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. सी. केवट यांच्यावर आहे.
-----
120821\1751img-20210812-wa0043.jpg
खुलताबाद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची रंगरंगोटी करून भिंती बोलक्या झाल्या आहेत.