औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद सुरूच असून पुढील विकेट कुणाची पडणार, अशी चर्चा चालू आहे. विजय साळवे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवून ख्वाजा शरफोद्दीन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कदीर मौलाना हे नुकतेच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. यावेळी विजय साळवेही उपस्थित होते. त्यांनी नव्या नियुक्तीला आक्षेप घेतला. कार्यकर्ते संभ्रमावस्थेत असल्याचे कदीर मौलाना यांनी पवार यांना सांगितले. जयंतरावांशी बोलतो, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
तोंडावर निवडणुका आलेल्या आहेत. पक्षश्रेष्ठीकडून दुर्लक्षित असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाची ताकद नगण्य आहे. पुढील निवडणुकांमध्ये ती फारशी चांगली राहील, अशी शक्यता दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष पदावरून पक्षात पुन्हा गटबाजीला उधाण आलेले आहे.अभय पाटील चिकटगावकर यांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बरेच दिवस झाले तरी ते पद रिक्तच आहे. या पदासाठी दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढत आहे. मनोज घोडके, विशाल सुरासे, शैलेश सुरासे, संतोष कोल्हे आदींना या पदावर वर्णी लागावी असे वाटते व त्यादृष्टीने त्यांची फिल्डिंग सुरू आहे. जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांच्या विरोधातही जिल्ह्यात एक गट सक्रिय असून तेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरीत असतात.
एन. ११ मध्ये पक्षाचे सुसज्ज कार्यालय आहे; पण त्याचा पक्षवाढीसाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही. पक्षाचे मोठमोठे नेते आल्यावरच या कार्यालयात गर्दी बघायला मिळते आणि हे मोठमोठे नेते नेहमी येत नसतात. पक्षांतर्गत खदखद चालूच राहिली आणि गटबाजीला आळा बसला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात फारसे स्थान राहील, असे वाटत नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.