औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सुविधांविना चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयांची संलग्नता यंदा विद्यापीठ काढणार का, असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर आहे. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे हे मागील दीड वर्षाच्या कालावधीत गुणवत्तावाढीची अपेक्षा विद्यापीठातील विभाग आणि महाविद्यालयांकडून करीत आहेत. संशोधन आणि अध्यापन याचा दर्जा उंचावल्याशिवाय विद्यापीठ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार नाही, असे ते वारंवार बोलून दाखवत आहेत. कुलगुरूंचा हा आग्रह असताना दुसऱ्या बाजूला अनेक महाविद्यालयांत सुविधाच नसताना ती चालू आहेत, असे चित्र आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे केवळ संस्थाचालकांची घरे चालविण्याचे काम होत असल्याची टीका होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने यंदा संलग्नीकरणाची प्रक्रिया कडकपणे राबविण्याचे जाहीर केले आहे. मात्र, दुसरीकडे महाविद्यालयांच्या संलग्नीकरणासाठी जाहीर झालेल्या समित्यांमध्ये वशिल्याचे सदस्य भरती झाल्याचे चित्र आहे. या समित्यांनी आपले अहवाल १० एप्रिलपर्यंत विद्यापीठाला सादर केले आहेत. आता विद्यापीठाची अधिसभा आणि विद्या परिषदेचे सदस्य असलेली समिती त्यावर निर्णय घेणार आहे. पीजी टीचर नाहीऔरंगाबाद शहरासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच तालुकास्तरावर अनेक ठिकाणी पदव्युत्तर कोर्सेस (पोस्ट ग्रॅज्युएट) चालू असल्याचे चित्र आहे. मात्र, या अभ्यासक्रमांसाठी पात्र प्राध्यापक नसल्याची स्थिती आहे.यामुळे पात्र प्राध्यापकाविनाच ही महाविद्यालये सुरू आहेत. मात्र, संस्थाचालकांचा दबाब आणि विद्यापीठ प्रशासन तसेच व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या दबावामुळे आजपर्यंत सुविधा नसलेल्या एकाही महाविद्यालयाचे संलग्नीकरण रद्द झालेले नाही. त्यामुळे विद्यापीठाकडे आलेल्या संलग्नीकरण अहवालांबाबत आता समिती आणि विद्यापीठ काय निर्णय घेते, याकडे संस्थाचालकांसह शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विद्यापीठाने संलग्नीकरणासाठी जे निकष ठेवलेले आहेत त्या निकषांपैकी पन्नास टक्के सुविधाही महाविद्यालयांत नसल्याचे चित्र आहे.
सुविधा नसलेल्या महाविद्यालयांची संलग्नता काढणार?
By admin | Published: April 20, 2016 12:34 AM