स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : एरव्ही साथीच्या आजारांसाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज असते. परंतु करोना आजार नवीन... त्याची उपचार पद्धती माहीत नाही. यासह अनेक आव्हानांना सामोरे जात आम्ही सारे एकजुटीने कोरोनाचे युद्ध लढत आहोत. ते जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहोत. सर्वांच्या सहकार्याने कोरोनाची तिसऱी लाटही रोखण्यात यश मिळवू, असा विश्वास औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांनी व्यक्त केला.
चार वर्षांपासून डॉ. पाडळकर मनपा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कोरोना काळातील त्यांची कामगिरी उत्तम राहिली. जिल्हा व मनपा प्रशासनाच्या सहकार्याने त्यांनी एक टीम म्हणून काम केले आणि त्यात यश मिळविले.
प्रश्न : कोरोना सुरू झाला आणि कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?
उत्तर : डेंग्यू, गॅस्ट्रो व इतर साथीचे आजार हाताळण्यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडे सक्षम यंत्रणा आहे. यासंदर्भातील कार्यपद्धतीची नियमावली तयार आहे. परंतु कोरोना हा नवीन आजार... त्याची उपचार पद्धती माहीत नव्हती. सुरुवातीच्या काळात तर रुग्ण शोधणं, त्याला आयसोलेट करणं ही कामं जिकिरीची होती. मनपा आयुक्त डॉ. आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करून महापालिकेचा अधिकारी व कर्मचारी वर्ग कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरवला. क्वारंटाईन सेंटर व कोविड केअर सेंटर सुरू करण्याची गरज होती. रुग्णांच्या उपचारासाठी कर्मचारी नियुक्त करणे, त्यांना प्रशिक्षित करणे यावर भर देण्यात आला. या सेवेत कोणी यायला तयार नव्हते. अशावेळी मॅनपाॅवर उभी करण्याचं मोठं आव्हान होतं. साधनसामग्री खरेदी करायची होती.
प्रश्न : सर्वजण घाबरलेले होते. अशावेळी आपले काय प्रयत्न राहिले?
उत्तर : सर्वजण घाबरले होते हे तर खरेच आहे. लोकांची ही मानसिकता एकीकडे हाताळायची. स्टाफला सोबत घेऊन चालायचं. नक्कीच टेन्शन होतं. हळूहळू खूप मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग वाढवल्या. शहराच्या प्रवेशद्वारावरच टेस्टिंग होऊ लागल्या. हे सारं मोठं आव्हानात्मक होतं. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांनी मेल्ट्रॉन येथे ३०० खाटांचा दवाखाना सुरू केला. मेल्ट्रॉनमध्ये आतापर्यंत सहा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. पुणे खासगी डॉक्टरांचीही साथ मिळायला लागली. त्यांच्याशी समन्वय ठेवून काम सुरूच आहे.
प्रश्न : लसीकरणाबद्दल काय सांगाल?
उत्तर : लसीकरणाबद्दल महापालिका पुरेशी संवेदनशील आहे. महापालिकेच्या ११५ वॉर्डांमध्ये लसीकरणासाठी बूथ तयार केलेले आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे हे सर्वच्या सर्व बूथ चालू नाहीत. लसीचा पुरेसा पुरवठा झाल्यास हे बूथ पूर्ण कार्यक्षमतेने चालू राहतील. आतापर्यंत २ लाख ८७ हजार नागरिकांचे लसीकरण केलेले आहे.
प्रश्न : तिसरी लाट कशी रोखणार?
उत्तर : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महापालिका सज्ज झालेली आहे. महापालिका आयुक्त डॉ. अस्तिककुमार पांडेय यांचा या लढ्यात भरभक्कम पाठिंबा व सहकार्य मिळत आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचं मार्गदर्शनही मिळतेय. तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेऊन १२५ खाटांचे गरवारे येथे आणि १०० खाटांचे एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर हॉस्पिटल सुरू करण्यात येईल.
प्रश्न : कोरोनाबद्दल जनजागृती कशी केली?
उत्तर : महापालिकेतर्फे जनजागृतीवर खूप भर देण्यात आला. कोरोना टेस्ट केल्यानंतर २४ तासात रिपोर्ट कळला पाहिजे, यासाठी ॲप तयार करण्यात आला. पोस्टर्सद्वारेही जनजागृती करण्यात आली. शहराच्या विविध भागात ४० ते ५० ठिकाणी मोफत टेस्टिंग सुरू असते. चार ते पाच ठिकाणी ही टेस्टिंग चोवीस तास सुरू असते. आतापर्यंतच्या कामाच्या अनुभवावर व सर्वांच्या सहकार्याने तिसरी लाट परतवून लावूया.