औरंगाबाद : घरातील बेडरुममध्ये बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठी आणलेले स्पिरिंट, रंग द्रव्य, सुगंधी द्रव्यासह सिलबंद बॉटल मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिल्लोड शहरातील दुर्गानगर येथे कारवाई करीत बनावट मद्य तयार करणारा घरगुती कारखाना उद्धवस्थ केला. या कारवाईत २ लाख ७६ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
दीपक ठकुबा गुंजाळ (रा. दुर्गानगर, सिल्लोड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. उत्पादन शुल्क 'क' विभागाचे दुय्यम निरीक्षक एस.एस. पाटील यांच्या पथकास दीपक हा बनावट विदेशी मद्य तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारला. या छाप्यात पथकाला विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे मॅकडॉवल्स नंबर १ व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या ४७४ सिलबंद दारूच्या बाटल्या, १० कॅनमध्ये १७० लिटर स्पिरीट, एका बाटलीमध्ये ७५० मिलि अर्क कॅरामल रंग, तीन बाटल्यामध्ये ३ लिटर सुगंधित, स्वाद इसेन्स द्रव्य, तीन पोत्यात बाटल्यांवर लावण्यात येणारे २ हजार ७१० जिवंत बुचे, बाटल्या साठविण्यासाठीचे २० खोके, १२ पोत्यात १९०० रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. या सर्वांची किंमत २ लाख ७६ हजार ४१५ रुपये एवढी होते.
हा मुद्देमाल जप्त केल्यानंतर आरोपीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक नारायण डहाके, दुय्यम निरीक्षक एस.एस. पाटील, स.डी. घुले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.एम. भारती, एस.एस.गुंजाळे, जवान एम.एच.बहुरे, बी.सी. किरवले, एस.एस. खरात, आर.एल. बनकर, ए.एस. अन्नदाते यांच्या पथकाने केली.
बेडरुमच्या कॉटमध्ये लपवले साहित्यआरोपी दीपक गुंजाळ याने बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठीचे साहित्य स्वत:च्या बेडरुममधील कॉटमध्ये असलेल्या ड्राव्हरात लपवून ठेवले होते. तसेच स्पिरिटचे कॅनही बेडरुममध्येच ठेवल्याची माहिती समोर आली. मागील अनेक दिवसांपासून आरोपी हा गोरखधंदा करीत होता, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचे स्पष्ट झाले.