लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या कोपराला मंत्रिपदाचा गूळ लावून ठेवला आहे. हे मंत्रिपद राणेंना मिळेल की नाही, हे ईश्वराला आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच माहीत, अशी कोपरखळी आज येथे काँग्रेसचे खासदार व माजी कामगारमंत्री हुसेन दलवाई यांनीमारली.दुपारी ते सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. विविध प्रश्नांना उत्तरे देताना दलवाई यांनी यावेळी गुजरातमध्ये काँग्रेस निवडून येणार याबद्दल आता शंका राहिलेली नाही, असे उद्गार काढले.त्यांनी टीका केली की, महाराष्टÑातही भाजप अतिआत्मविश्वासात आहे. जे काही करायचे ते आम्हीच करू या आविर्भावात भाजप असते. बाकीच्यांना ते कमी लेखतात. केंद्रात एका मंत्रिपदावर शिवसेनेची बोळवण करण्यात आली आहे. रामदास आठवले यांना खुळखुळा देण्यात आला. मित्रपक्षांंना भाजप सन्मानाने वागवत नाही, तरी शिवसेना त्यांच्या दारात उभी आहे. शिवसेनेला कधीच सत्तेतून बाहेर पडायला हवे होते. आता त्यांना उशीरच होतोय. सत्तेतही राहायचे आणि विरोधी पक्षाचीही भूमिका बजावायची हा खेळ शिवसेना खेळत राहिली. आता लोकांचे प्रश्न तीव्र बनले आहेत. त्यामुळे शिवसेनेला एक भूमिका घ्यावी लागेल.शरद पवार - उद्धव ठाकरे यांची अलीकडे भेट झाली; पण पवार ठाकरेंच्या कानात काय बोलले हे त्यांनाच माहीत, असा टोला त्यांनी मारला.नारायण राणे काँग्रेस सोडून गेल्यामुळे कोकणातील कार्यकर्त्यांना वनवासातून सुटलो, असे वाटत आहे. त्यांच्या नेतृत्वाला लोक विटलेले होते. त्यांची व त्यांच्या मुलांची दादागिरी चालायची. राजकारणात दादागिरी चालत नाही. लोकांच्या हातात मताचे मूल्य आहे, याची जाणीव आवश्यक आहे, असे दलवाई म्हणाले.
फडणवीसांनी राणेंच्या कोपराला मंत्रिपदाचा लावलाय गूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:37 AM