औरंगाबाद : कोणी मित्रांसोबत आले होते, तर कोणी कुटुंबासह. गेली चार महिने ज्या लसीची प्रतीक्षा होती, ती लस घेताना तरुण प्रचंड उत्स्तुक होते. लस घेतल्यानंतर कोरोनावर विजय मिळविणारच, हा विश्वास प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर शनिवारी औरंगाबादेत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी लसीची ढाल घेण्यासाठी तरुणाईत मोठा उत्साह पहायला मिळाला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दुपारी २ वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर, अधिपरिचारिका कुसुम भालेराव, श्रीलंका पवार, रेशमा शेख, अनिता जारवाल, गुलबस नागरगोजे, जना मुंढे, सागर दखणे, निखिल घोरपडे आदी उपस्थित होते. पहिला लाभार्थी ठरलेला प्रतीक वाणी या तरुणास अधिपरिचारिका कुसुम भालेराव यांनी दुपारी २ वाजता लस दिली. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासूनच तयारी करण्यात आली. येथे १०० जणांचे लसीकरण झाले, तर महापालिकेच्या सादातनगर, कैसर काॅलनी, मुकुंदवाडी येथील आरोग्य केंद्रांवर एकूण १३९ जणांचे लसीकरण झाल्याचे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
----
मायलेकाने घेतली सोबतच लस
एन-९, रायगडनगर येथील रहिवासी योगिता कानडे आणि त्यांचा मुलगा ऋषीकेश यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालयात सोबतच लस घेतली. लस घेताना इंजेक्शनची सुई टोचताच ऋषीकेशने घट्ट डोळे मिटले. त्याच वेळी त्याच्या आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवत पाठबळ दिले. त्यानंतर योगिता यांनीही लस घेतली.
----
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला युवावर्गाशी संवाद
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता त्यादृष्टीने जास्तीत जास्त लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या. यावेळी लसीकरण करण्यासाठी आलेल्या युवावर्गाशी संवाद साधत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.
------
लसीनंतरही खबरदारी गरजेची
लसीकरणासाठी २८ एप्रिलला नोंदणी केली होती; पण स्लाॅटची प्रतीक्षा होती. अखेर शुक्रवारी रात्री १ वाजता स्लाॅट मिळाला. अखेर लस घेतली. लस घेताना कोणतीही भीती मनात नव्हती. लस घेतली तरी मास्क, विनाकारण न फिरणे, या गोष्टींचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
- प्रतीक वाणी, पहिला लाभार्थी
----
महिलांनी पुढे यावे
लस घेण्यासाठी खूप उत्सुक होते. अनेक दिवसांपासून वाट पाहात होते. कामकाजानिमित्त महिला घराबाहेर पडत असतात. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता महिलांनीही लस घेण्यासाठी पुढे आले पाहिजे.
- गौरी वाणी
------
लस महत्त्वाचीच
जानेवारीत लसीकरण सुरू झाले. तेव्हापासून आपल्याला लस कधी मिळते, याचीच वाट पाहात होतो. लसीची नाही, पण मला इंजेक्शनच्या सुईची भीती वाटली. लस ही कोरोना प्रतिबंधासाठी महत्त्वाचीच आहे. ती सर्वांनी घ्यावी.
- ऋषीकेश कानडे
------
इतरांनाही प्रेरित करणार
माझ्या आई-वडिलांनी लस घेतली आहे. अखेर मलाही लस मिळाली. लस घेतल्यामुळे खूप चांगले वाटत आहे. लस ही सुरक्षितच आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी नक्की प्रेरित करणार आहे.
-ऋतुजा वाडकर
------
लस घेतली म्हणून फिरू नका
लस घेतली म्हणजे आपण सुरक्षित झालो, असे समजून तरुणांनी विनाकारण फिरता कामा नये. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ, ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळत होती. आता १८ वर्षांवरील व्यक्तीला लस दिली जात आहे. नोंदणी केलेल्या १०० जणांना जिल्हा रुग्णालयात लस दिली जाईल.
-कुसुम भालेराव, अधिपरिचारिका, जिल्हा रुग्णाल
-------
फोटो ओळ...
१) जिल्हा रुग्णालयात १८ ते ४४ या वयोगटातील पहिला लाभार्थी प्रतीक वाणी यास लस देताना अधिपरिचारिका कुसुम भालेराव. यावेळी उपस्थित अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर, निखिल घोरपडे.
२)मुलाला लस देताना त्याच्या आईने खांद्यावर हात ठेवत अशाप्रकारे पाठबळ दिले.
३)- प्रतीक वाणी, पहिला लाभार्थी
४)- गौरी वाणी
५)- ऋषीकेश कानडे
६)-ऋतुजा वाडकर