छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मजहर अन्वर खान व त्यांच्या पत्नी सचिव आस्मा इद्रीस खान यांच्या विरोधात बीएचएमएसची बनावट पदवी व गुणपत्रक तयार केल्यामुळे बंगळुरू येथील टिळकनगर पोलिस ठाण्यात १४ जानेवारी रोजी गुन्हा नोंदविला. या प्रकरणात बंगळुरू पोलिसांच्या पथकाने सिटी चौक पोलिसांच्या मदतीने मजहर खान यांना मंगळवारी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली.
राजीव गांधी हेल्थ सायन्सेस विद्यापीठाचे (आरजीयुएचएस) कुलसचिव डॉ. रियाझ बाशा यांनी बंगळुरू येथील टिळकनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ७ ऑगस्ट २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगरातील गाडे ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने अस्मान खान यांचे गुणपत्रक पडताळणीसाठी पाठविले होते. हे गुणपत्रक विद्यापीठातील नोंदीशी जुळत नसल्याची माहिती ४ सप्टेंबर २०२४ रोजी गाडे हॉस्पिटलला विद्यापीठाने दिली. त्याशिवाय राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाने (एनसीएच) देखील बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रासंदर्भात विद्यापीठाकडे विचारणा केली. तेव्हा या प्रमाणपत्रात डॉ. बी. डी. जत्ती होमिओपॅथी महाविद्यालय, धारवाड येथे शिक्षण घेतल्याचा दावा केला होता. विद्यापीठाने २८ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याची पडताळणी करून एनसीएचला उत्तर दिले. त्यानुसार अस्मा खान यांनी विद्यापीठ व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला नाही, तसेच त्यांना विद्यापीठाने कोणतीही पदवी, गुणपत्रक दिलेले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांच्याकडे असलेली विद्यापीठाची बीएचएमएसची पदवी, गुणपत्रक हे बनावट आहे. त्यात विद्यापीठाच्या लोगोचाही गैरवापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे विद्यापीठाने त्या प्रमाणपत्राचा वैद्यकीय व्यवसायासाठीचा वापरही अवैध ठरविला. पोलिस ठाण्यात अस्मा खान आणि मजहर खान यांच्या विरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विद्यापीठाच्या लोगोचा अवैध वापर केल्याचा गुन्हा नोंदविला.
अशी केली अटकबंगळुरू पोलिसांचे पथक शहरात आले. त्यांनी निरीक्षक निर्मला परदेशी यांना मदतीसाठी पत्र दिले. परदेशी यांनी उपनिरीक्षक अर्जुन मोरे आणि अंमलदार राजेंद्र साळुंके यांना पथकासोबत पाठवले. पथकाने एन-११ येथील घरातून दुपारी मजहर खान यांना ताब्यात घेतले. याविषयीची नोंद सिटी चौक पोलिस ठाण्यात करण्यात आली.
उत्तर प्रदेशातही बनावट पदवीचा गुन्हाउत्तर प्रदेशातील जौनपूर पोलिस ठाण्यातही मजहर खान व अस्मा खान यांच्या विरोधात कायद्याची बनावट पदवी मिळवल्याचा गुन्हा दाखल आहे. या पदवीवर मजहर खान यांनी बार कौन्सिलचे ओळखपत्रही मिळविलेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.