औरंगाबाद : बनावट नोटा चलनात आणणार्या रॅकेटचा पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पर्दाफाश केला. या टोळीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या दीड लाखांच्या ३०० बनावट नोटा आणि दोन दुचाकी जप्त केल्या.
अफसर पठाण (३८, रा. नारेगाव), भिका वाघमारे (३९, रा. चिकलठाणा, मूळ रा. लक्ष्मीनारायणपुरा, जुना जालना) आणि सुनील बोराडे (३५, रा. श्रीरामपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले की, शहरातील कॅनॉट प्लेस परिसरात दोन जण पाचशे रुपये चलनाच्या बनावट नोटांसह फिरत असल्याची माहिती खबर्याकडून पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वामन बेले, कर्मचारी प्रमोद पवार, इसाक पठाण, विनोद परदेशी, गणेश वैराळकर, विनायक गीते आणि महिला पोलीस काळे यांनी कॅनॉट प्लेस येथे आरोपींचा शोध घेतला असता एका हॉॅटेलसमोर आरोपी अफसर पठाण हा मोटारसायकलवर तर भिका वाघमारे मोपेडवर आपसात बोलत जात असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांच्या मागून वेगात जाऊन त्यांची वाहने आडवी लावली आणि त्यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.
टाण्यात पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता अफसरच्या खिशात पाचशे रुपयांच्या बनावट ६६ नोटा तर वाघमारेच्या खिशात पाचशे रुपयांच्या बनावट १०० नोटा आाणि मोपेडच्या डिक्कीत पाचशे रुपयांच्या १०० बनावट नोटा मिळाल्या. याशिवाय त्यांच्याकडे अनुक्रमे रोख १० हजार रुपये आणि ५१० रुपये ओरिजनल मिळाले. त्यांची कसून चौकशी केली असता अफसर यास भिका वाघमारे याने या नोटा दिल्याचे त्याने सांगितले. भिकाने चौकशीअंती कमिशन तत्त्वावर या नोटा श्रीरामपूर येथील सुनील बोराडे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. ५० हजार रुपये देऊन आरोपी सुनीलकडून एक लाखाच्या बनावट नोटा घेतल्याचे सांगितले. सुनील ही रक्कम घेण्यासाठी शहरात येणार असल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांच्या सांगण्यावरून आरोपींनी त्याच्याशी संपर्क साधून रात्री साडेबारा वाजता पंचवटी चौकात बोलावून घेतले. तो तेथे येताच सापळा रचून थांबलेल्या पोलिसांनी त्यास पकडले. त्याच्याकडेही पाचशे रुपयांच्या बनावट ३४ नोटा पोलिसांना मिळाल्या.