औरंगाबाद : बारी कॉलनी येथे दोनशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर जिन्सी गुन्हे शोध पथकाने धाड टाकून ४४ हजारांच्या बनावट नोटांसह प्रिंटर व इतर साहित्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
नोटाबंदीनंतर मार्केटमध्ये आलेल्या नोटांची बनावट नोट कुणीही बनविणार नाही, असा दावा औरंगाबादेतील बनावट नोटा छपाईच्या कारखान्याने फेटाळून लावला आहे. कारण बनावट नोटा बनविणाऱ्या कारखान्यावर औरंगाबादेत दुसऱ्यांदा धाड टाकली आहे. यापूर्वीदेखील असाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. शेख हारूण शेख बशीर, सय्यद शोहरत अजगर अली, असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. बारी कॉलनीतील गल्ली नं.६ मध्ये एका खोलीत दोनशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा तयार करून ही टोळी मार्केटमध्ये नोटा विकत असल्याची माहिती जिन्सी ठाण्यात गुन्हे शोध पथकाला मिळाली होती.
त्यानुसार फौजदार दत्ता शेळके, अय्युब पठाण, शेख रफिक, संजय गावंडे, हारूण शेख, गणेश नागरे, धनंजय पाडळकर यांच्या टीमने बारी कॉलनीत दुपारी ३ वाजेनंतर छापा मारला. त्यावेळी दोन्ही आरोपी बंद खोलीत नोटांचा जुगाड लावताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून बनावट ४४ हजार रुपये घेतले असून, त्यात २०० व १०० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. भारतीय चलनाच्या १० हजार रुपयांच्या (१०० व २०० रुपये) नोटा सापडल्या. १२ हजार रुपयांचे एक रंगीत प्रिंटर, १० हजार रुपयांचे एक प्रिंटर, ४ हजार रुपयांचे नोटा बनविण्यासाठी लागणारे साहित्य पोलिसांच्या टीमने जप्त केले आहे.
अशी होते बनावट नोट तयार...आरोपीने नकली नोटा बनविण्यासाठी बाँड पेपरचा वापर करून ओरिजनल नोट स्कॅन करून तिची प्रिंटरमधून छपाई करण्यात येत होती. खऱ्या नोटाचा आकार मोजून कागद कापला जायचा, तसेच त्यावरील हिरव्या पट्ट्या आणि गांधीजींची मुद्रा हुबेहूब दिसावी म्हणून प्लास्टिकचे स्टीकर त्यावर प्रेस केले जात होते. दक्षतापूर्वक ही टोळी नोटा बनविण्याच्या उद्योगात गुंतली होती.
व्यापाऱ्यांनी केली होती चर्चा मार्केटमध्ये बनावट नोटांचा शिरकाव झाला असून, त्या सर्रासपणे मार्केटमध्ये चालविल्या जात आहेत. त्याकडे कुणाचे लक्ष नसल्याचे वृत्तदेखील लोकमतने प्रसिद्ध केले होते. नवीन नोटा असल्याने त्या बनावट कशा असतील, त्या ओळखाव्या कशा, असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
मार्केटमध्ये किती नोटा आल्याबारी कॉलनीत बनावट नोटा बनविणारी टोळी ५ वी ते ७ वीपर्यंत शिक्षण घेतलेले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. परंतु नव्या करकरीत नोटात बनावट नोटा मिसळून त्या मार्केटमध्ये चालविणाऱ्यांची कला पाहून पोलीसही आश्चर्यचकित झाले. आरोपी शेख हारूण शेख बशीर, त्याचा साथीदार सय्यद शोहरत अजगर अली यांच्या ताब्यातून ४४ हजारांच्या नोटा जप्त केल्या. त्यांनी हा उपद्व्याप किती दिवसांपासून सुरू केला होता. त्यांनी मार्केटमध्ये किती नोटा पसरविल्या आहेत. अशा विविध प्रश्नांची उकल होणे बाकी आहे. या टोळीसोबत अजून कोणकोण आहेत, याचा शोध जिन्सी पोलीस घेणार आहेत. दोन्ही आरोपीला जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.