औरंगाबाद : विविध खाजगी विमा कंपनीच्या पॉलिसी विक्री केल्यानंतर त्यावर जमा होणारा बोनस परत करण्यासाठी टॅक्ससह अन्य चार्जेसच्या नावाखाली एका वृद्धाची तब्बल १६ लाख ५४ हजार रुपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २० जणांविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
विक्रम पाटील, रवींद्र काजारे, एकनाथ पाटील, सूर्यकांत दीक्षित, चिराग पटेल, पंकज मोरे, सौरभसिंग , राजू पालांडे, सागर भोईर, जुल्फिकार शेख, एसबीआयच्या मुंबईतील कल्याण आणि ठाणे शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक, इंडसइंड बँकेचा व्यवस्थापक आणि सहा महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी संगनमत करून आणि कट रचून शहानूरवाडी येथील मोहन कडूबा सोनवणे यांना बजाज लाईफ, बजाज अलियांज लाईफ लाँग, रिलायन्स लाईफ आणि बजाज फिनसर्व्ह कंपनी गुजरात आदी कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून त्यांना वेळोवेळी विमा पॉलिसी विक्री केल्या.
तक्रारदारांनी पॉलिसी खरेदी केल्यानंतर ते अॅटोमॅटिक पद्धतीने रद्द झाल्याचे सांगून त्यांना अन्य पॉलिसी खरेदी करायला ते लावत. काही दिवसांनंतर त्यांनी पुन्हा तक्रारदार यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला सुमारे ४५ लाख रुपये बोनस स्वरूपात मिळणार आहे, असे सांगितले. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी टॅक्स रक्कम, प्रोसेसिंग शुल्कासह अन्य शुल्काच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांत आॅनलाईन रकमा पाठविण्यास भाग पाडले. सुमारे ६५ वेळा सोनवणे यांनी आरोपींच्या खात्यात आॅनलाईन पद्धतीने पैसे जमा केले. विमा हप्ता आणि अन्य वेळा भरलेले पैसे एकूण १६ लाख ५४ हजारांपर्यंत गेले. त्यानंतरही आरोपींनी त्यांना बोनसची रक्कम म्हणून एक रुपयाही तक्रारदार यांच्या खात्यात जमा केला नाही.
आरोपी बजाज अलियांज विमा कंपनीच्या खात्यात ही रक्कम जमा करीत असल्याचे सांगत. प्रत्यक्षात ती रक्कम दुसऱ्याच खाजगी व्यक्तीच्या बँक खात्यात जमा केली जाई. यावरून ही फसवणूक बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. याप्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारअर्ज दिला होता. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, कर्मचारी सुनील फेपाळे, प्रकाश काळे आणि मनोज उईके यांनी तक्रारीची चौकशी करून याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला.
बँकांनी दिली नाही दादतक्रारदार सोनवणे यांना ११ नोव्हेंबर २०१४ ते आॅक्टोबर २०१८ या कालवधीत आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून तब्बल ६५ वेळा आॅनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी आरोपींना आॅनलाईन बँकिंग पद्धतीने १७ लाख ५४ हजार रुपये पाठविले. विशेष म्हणजे या रकमा विमा कंपनीच्या खात्यात जमा करण्याऐवजी बँक अधिकाऱ्यांनी आरोपींच्या वैयक्तिक खात्यात जमा केल्या. ही बाब समजताच तक्रारदारांनी बँकांशी संपर्क साधून दुसऱ्यांच्या खात्यात परस्पर जमा केलेली रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र, बँकांनी त्यांना दाद दिली नाही.