औरंगाबाद : आडगाव बु. येथे जय जवान सैनिक पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राआड बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी छापा मारून १९ लाखांची देशी दारू व इतर साहित्य जप्त केले (A fake liquor factory was set up at the police recruitment training center) . पाच जणांना अटक केली तर मुख्य सूत्रधारासह नऊ जण फरार आहेत.
आडगाव शिवारात दोन खोल्यांत हा बनावट देशी दारू बनविण्याचा कारखाना अशोक डवले व अन्य साथीदारासह बनवित असल्याची माहिती मिळाली. जय जवान सैनिक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राआड हा उद्योग सुरू होता. मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी होणाऱ्या पार्ट्या किंवा शहरात चोरून दारू विक्री करणाऱ्यासाठी येथून ही बनावट दारूविक्री केली जात असावी, असा अंदाज पथकाने व्यक्त केला आहे.
फलकामुळे बिनधास्त, राजरोस..दोन खोल्यांबाहेर भरती केंद्राचा फलक होता, त्यामुळे कुणालाही शंका येणे शक्यच नव्हते. परंतु बेकायदा बनावट देशी दारू तयार करून १८० मिली क्षमतेच्या बाटल्या, टंगोपंच, दारू बॉटलिंग मशीन, बूच बनविणारे यंत्र, लेबल इ.सह १९ लाख ७६० रुपयांचा माल उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला. आरोपी जितेंद्रसिंग, रविसिंग ब्रिजभानसिंग, जयबलीसिंग राखनसिंग (सर्व रा. बरसेली, जि. सिंधी, मध्य प्रदेश), प्रशांत अनिल खैरनार (रा. धुळे) , चैतन्य रामकृष्ण म्हैसकर (बेगमपुरा) यांना ताब्यात घेतले आहे. मुख्य सूत्रधार अशोक किसन डवले व अन्य नऊ जण फरार आहेत. अटकेतील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास निरीक्षक जावेद कुरेशी करीत आहेत.पथकात निरीक्षक शरद फटांगडे, जावेद कुरेशी, दुय्यम निरीक्षक गणेश पवार, भारत दौड, अशोक सपकाळ, जवान अनिल जायभाये, योगेश कल्याणकर, विजय मकरंद, किसन सुंदर्डे आदींचा समावेश होता.