गंगापूर तालुक्यातील माळीवाडगाव येथील एका तरुणाचा विवाह मालेगाव येथील शिवा राजपूत या दलालमार्फत सध्या नाशिक येथे राहणाऱ्या व मूळ वसमत (जि. हिंगोली) येथील असणाऱ्या उषा रामा लोखंडे या महिलेच्या सोनू या मुलीशी १५ मार्चला माळीवाडगाव येथे झाला होता. २२ मार्चला नवविवाहित सोनूने स्वयंपाकात गुंगीचे औषध टाकून घरातून पोबारा केला. सकाळी नववधू न दिसल्याने शिल्लेगाव पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली. यानंतर शंका आल्याने नवविवाहित मुलाने मध्यस्थी करणाऱ्या शिवा राजपूतशी संपर्क साधला, त्याला ही बाब माहिती नसल्याने त्याने मी पुन्हा सदर महिलेशी संपर्क साधून देवनळा येथे मुलगी दाखविण्यास बोलावून घेतो, तुम्ही पोलिसांकरवी त्यांना पकडा म्हणून सांगितले. यानंतर सदर नवविवाहित मुलाने पोलिसांनी ही माहिती दिली. त्यानंतर शिल्लेगाव ठाण्याचे संतोष गिरी, जाधव यांनी शुक्रवारी देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे एपीआय संजय आहिरे, पीएसआय शैलेश जाेगदंड, बिट अंमलदार आप्पासाहेब काळे, राहुल ठोंबरे, किसन गवळी यांच्या मदतीने औरंगाबाद-नाशिकरोडवरील एका हॉटेलसमोर सापळा रचला. ठरल्यानुसार दोन कार (एम.एच.१५ ई,०२५६ व एम.एच.४१एएम०८०९)ने तीन महिला व चार पुरुष उतरले. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांची लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत आणून अधिक चौकशी केली असता या टोळीची मुख्य सूत्रधार हिने तिचे नाव आशा विलास खडसे (रा. रेल्वे स्टेशन, वाशिम)असल्याचे सांगून तिचे सोबत लग्नाकरिता आलेली मुलगी कल्पना सुधाकर पाटील (रा. कासगाव, मुंबई) व सोबत सविता चंद्रकला कुलकर्णी (रा. नाशिक) व नीलेश दिलीप पाटील (रा. नाशिक) असे असल्याचे सांगितले.
यातील मुख्य आरोपी आशा खडसे हिच्या मोबाइलमध्ये एकाच मुलीचे अनेकांशी विवाह लावून दिल्याचे छायाचित्रे सापडल्यानंतर पोलीसही चक्रावले होते. या टोळीतील आरोपींकडून सात मोबाइल व सात बनावट महिलांचे आधारकार्डसह एक कार असा ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अशाच प्रकारे नाशिक, जळगाव, औरंगाबाद यांसह गुजरात राज्यात बनावट लग्न लावून पैसे उकळून फसवूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे.
चौकट
माळीवाडगावच्या तरुणाकडून उकळले अडीच लाख रुपये
ही टोळी प्रामुख्याने एजंटमार्फत लग्नास इच्छुक मुलांची माहिती घेऊन त्यांना घेरत असे. त्यांच्याशी बोलणी करून मुलीचे आई-वडील, मावशी बनून लग्न करुन द्यायचे, नंतर नववधू पोबारा करीत असे. माळीवाडगाव येथील तरुणाकडून या टोळीने अडीच लाख रुपये घेऊन लग्न करून दिले होते. त्यानंतर नववधूने चाळीस हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.
फोटो : माळीवाडगाव येथील तरुणाशी विवाह करून पळून गेलेली वधू.