फुलंब्री : तालुक्यातील वाहेगावनजीक बनावट देशी दारूचा साठा घेऊन जाणाऱ्या कारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत बनावट दारू व कारसह दहा लाखांचा माल जप्त करण्यात आला, तर भाऊलाल देवचंद जऱ्हाडे ऊर्फ चिंग्या व सुरेश विल्सन घुले (रा. नादी, ता. अंबड, जि. जालना) यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला खबऱ्याकडून बनावट दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार फुलंब्री तालुक्यातील वाहेगाव येथे डोंगरगाव चौफुलीवर भाऊलाल देवचंद जऱ्हाडे ऊर्फ चिंग्या व सुरेश विल्सन घुले (रा. नादी, ता. अंबड, जि. जालना) हे दोघे चारचाकी (क्र. एमएच-१२ केजे-३९६६) मध्ये बनावट असलेल्या देशी दारूच्या १,०५६ बाटल्या घेऊन जात होते. त्यांच्या कारला अडवून तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बनावट दारू व कारसह एकूण दहा लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुधाकर कदम यांंच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.एस. पतंगे, निरीक्षक ए.जे. कुरेशी, ए.एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ए.ए. महेंद्रकर, एस.आर. वाघचौरे, जी.बी. इंगळे, सहायक दुय्यम निरीक्षक पी.डी. पुरी, ए.जी. शेंदरकर यांनी केली.
फोटो :
बनावट देशी दारू व कार. यावेळी अटक करण्यात आलेले आरोपी, तर कारवाई करणारे राज्य उत्पादन सशुल्क विभागाचे अधिकारी.