लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील खड्डे १९ नोव्हेंबरपर्यंत बुजविण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सरसावली आहे. व्हीआयपी रोडवर डांबराच्या साह्याने खड्डे बुजविण्यात येत आहेत तर उर्वरित शहरात चक्क मुरूम आणि मातीचा वापर करून खड्डे बुजविण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र शहरात पाहायला मिळत आहे.शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. मागील सहा महिन्यांपासून महापालिका फक्त मुरूम, खडी आणि मातीचा वापर करून खड्डे बुजवत आहे. गणेशोत्सव, दसरा-दिवाळीतही महापालिकेने खड्डे बुजविण्याचे औदार्य दाखविले नाही. खड्ड्यांमुळे औरंगाबादकर बेजार झाले आहेत.१४ लाख नागरिकांना दररोज यातना सहन कराव्या लागत आहेत. यानंतरही महापालिका गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही. सोमवारी महापालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.वॉर्ड कार्यालयांतर्फे प्रमुख रस्त्यांवर अक्षरश: माती टाकण्यात येत होती. यापूर्वी पन्नास वेळेस महापालिकेने मातीचा वापर करून खड्डे बुजविण्याचा प्रयोग केला. माती तीन ते चार दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकत नाही, ही बाब महापालिकेतील ‘तज्ज्ञ’ अधिकाºयांनाही माहीत आहे. असे असतानाही मुरूम आणि मातीवर लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत.सोमवारी आमखास मैदानाजवळ डांबरचा बॉयलर पेटवून खड्डे बुजविण्याचे काम मनपाकडून सुरू होते. या कामातही अक्षम्य निष्काळजीपणा करण्यात येत आहे. सकाळी केलेले पॅचवर्क सायंकाळी पुन्हा जशास तसे होत आहे. डांबर कमी प्रमाणात वापरण्यात येत असल्याने खडी पुन्हा रस्त्यावर येत आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो, हे विशेष.
रस्त्यांच्या कामात ‘धूळफेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 12:31 AM