छत्रपती संभाजीनगर : लाइट बिलात खाडाखोड करून मतदार नोंदणीसाठी अर्ज केल्याची पाच प्रकरणे उघडकीस आली आहेत. पूर्व मतदारसंघातील हा प्रकार समोर आल्यामुळे बोगस मतदार नोंदणी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
दुबार मतदार नोंदणीची पडताळणी व त्यानंतर करावयाची नावे वगळणी याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांच्यासह सर्व विधानसभा क्षेत्रांचे निवडणूक निर्णय अधिकारी बैठकीस उपस्थित होते. जिल्ह्यात सर्व मिळून ७० हजार मतदारांची नावे दुबार आहेत.
असा उघडकीस आला प्रकारपूर्व मतदारसंघातील पाच प्रकरणे छाननीअंती समोर आली आहेत. रहिवासी पुरावा म्हणून वीज बिल ग्राह्य धरण्यात येते. मतदार नोंदणीसाठी आलेल्या अर्जासोबत दिलेल्या वीज बिल पुराव्याचा संशय आल्यामुळे ग्राहक क्रमांकावरून महावितरणकडे पडताळणी केली असता दुसरेच समोर आले. मात्र, वीज बिलाच्या झेरॉक्सवर मतदार म्हणून नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची नावे आढळून आली. हा सगळा डबलगेम असल्याचे लक्षात आले. असे पूर्व मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे यांनी सांगितले. मंगळवारी या प्रकरणात पोलिसांत तक्रार देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुबार नावे मागे घेण्यासाठी ३० पर्यंत मुदतज्या मतदारांना हे माहिती आहे की, आपले नाव दोन ठिकाणी नोंदविलेले आहे अशांनी स्वतःहून फॉर्म नं. ७ भरून आपले नाव वगळावे. त्यासाठी त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच विहित प्रक्रियेचा वापर करून नावे वगळण्याची प्रक्रियाही केली जाईल. जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदविण्याचे प्रकार निवडणूक यंत्रणेच्या निदर्शनास आले आहेत. अशा प्रकरणांची माहितीही विधानसभा क्षेत्रनिहाय सादर करण्यात आली. या प्रकरणात तत्काळ गुन्हे दाखल करा.-दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी