औरंगाबाद : लुटमारीची खोटी तक्रार करून पोलिसांना त्रास देणे तरुणाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यावर त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गणेश कडूबा कांबळे (रा. पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, १९ डिसेंबर रोजी रात्री पडेगाव येथील कादरी हॉस्पीटल जवळून गणेश कांबळे याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की, तो दुचाकीवरुन जाताना चारचाकी वाहन धारकाने त्याला अडवून त्याच्या खिशातील रक्कम, सोन्याची अंगठी आणि मोबाईल हिसकावून नेला. गस्तीवरील छावणी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक धर्मराज देशमुख हे सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले.
तेव्हा गणेश कांबळेने सांगितल्यानुसार माळीवाडा शिवारातील रेणुका पेट्रोलपंपावर त्याने सांगितलेले वाहन उभे दिसले. त्या वाहनाच्या चालक राकेश बाबुभाई वसावा (३९, रा. सेठी. ता. मंगरुळ जि. सुरत) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की, तो आणि त्याच्या ओळखीचे लक्ष्मण सेठ लेबर कॉन्ट्रक्टर हे गुजरातमधून येथे आले आहे. त्यांनी त्यांची कार येथे उभी करून ते औरंगाबाद येथून दुसरी जीप भाड्याने घेऊन पुण्याला गेले आहेत. आरोपी गणेशचा भाऊ त्यांच्यासोबत पुण्याला गेलेल्या वाहनाचा चालक आहे. रस्त्यात त्यांचा आणि गणेशच्या भावाचा वाद झाल्यामुळे त्याने फोन करून गणेशला याविषयी माहिती दिली. यानंतर गणेशने त्यांना अडकवण्यासाठी थेट पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून लुटमारीची तक्रार केली.
दरम्यान रात्री उशीरा पुण्याहुन परतलेल्या लक्ष्मण सेठ यांनीही पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये तथ्य असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी कांबळेला विचारताच भावाला भांडल्यामुळे त्यांच्याविरूध्द खोटी तक्रार केल्याची कबुली दिली. आज त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला.