छत्रपती संभाजीनगर : गणपतीची विसर्जनाआधी आरती सुरू असतानाच दोन सख्या भावांचे वाद पेटून भावावर चाकुने प्राणघातक हल्ला केल्याची घटना एन-६ मध्ये गुरूवारी सायंकळी साडेसात वाजता घडली. दोघेही सिडको ठाण्यात तक्रारीसाठी गेल्यानंतर ठाण्याबाहेर हाणामारी केली. त्यात आरोपी सनी सुभाष राणा याने महिला उपनिरीक्षक व अन्य एका पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत धमकावले. एकाच वादात चार गुन्हे दाखल करण्यात आले.
लव सुभाष राणा (३२, रा. एन-६) व त्याचा भाऊ सनी मध्ये कौटूंबिक वाद असून एकाच इमारतीत राहतात. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता लव घरात असताना सनी व त्याची पत्नी कोमल त्यांच्या घरी गेले. तुझ्या पत्नीने आमच्या विरोधात तक्रार का केली म्हणत सनीने थेट चाकुने भावावर वार केले. त्यानंतर दोघे रात्री साडेबारा वाजता दोन्ही कुटूंब ठाण्यात गेले. त्यानंतर पोलिसांनी सनीवर गुन्हा दाखल केला.
घरी एकमेकांना मारहाण करणाऱ्या दोन्ही भाऊ, त्यांच्या पत्नींनी पोलिस ठाण्याबाहेर धिंगाणा घालत एकमेकांना मारहाण सुरू केली. उपनिरीक्षक निशिगंधा म्हस्के, भाग्यश्री शिंदे यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करताच आरोपी त्यांच्यावर धावून गेले. धक्काबुक्कीत दोघींसह इतर कर्मचाऱ्यांना जखम झाली. पोलिसांनी चौघांवर धिंगाणा प्रकरणात गुन्हा दाखल केला. तर सनी व कोमल वर स्वतंत्र सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी सनी व कोमल ला अटक केली. सनी वर यापुर्वी गुन्हे दाखल असून शनिवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.