लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक अनिल माधवराव अग्रहारकर (५५, रा. मित्रविहार कॉलनी, उल्कानगरी) यांनी घरातील जीममध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अग्रहारकर यांनी आत्महत्येपूर्वी दोन पानांची ‘सुसाइड नोट’ लिहिली असून, त्यात चार व्यावसायिकांनी कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक अनिल अग्रहारकर यांचा मित्रविहार कॉलनीमध्ये बंगला आहे. तेथे ते पत्नी, मुलगा, मुलगी आणि सुनेसह राहतात. गुरुवारी सकाळी बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावरील जीममध्ये गेले. ७.३० वाजले तरी ते खाली आले नाहीत, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी पत्नी जीममध्ये गेल्या. तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यांना फासावरून खाली उतरवून जवळच्या हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना घाटीत पाठविण्यात आले. पोलिसांनी घराची झडती घेतल्यानंतर बेडरुममध्ये एक डायरी आढळून आली. डायरीत अग्रहारकर यांनी आत्महत्या करण्याचे कारण नमूद केले आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल अग्रहारकर हे बांधकाम व्यवसायातील अग्रगण्य संस्था ‘कॉन्फडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (क्रेडाई) औरंगाबाद शाखेचे कोषाध्यक्ष होते. त्यांचा चौरंगी हॉटेलच्या जागेवर बहुमजली इमारतीचा प्रकल्प सुरू होता, तसेच साई टेकडीसह इतर ठिकाणीही त्यांच्या बांधकाम साइट सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.