छत्रपती संभाजीनगर : अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी-२०२४ परीक्षेत देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रेरणा सुनील दिवाण हिने १०० टक्के पर्सेंटाईल मिळविले आहे. यानिमित्त तिचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. तसेच देवगिरीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ जूनला सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती उपप्राचार्य प्रा. नंदकिशोर गायकवाड यांनी दिली.
सीईटी सेलतर्फे ‘एमएचटी-सीईटी’त पहिल्या टप्प्यात २२ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत ‘पीसीबी’ ग्रुपसाठी तर २ ते १६ मे दरम्यान ‘पीसीएम’ ग्रुपसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७ लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयसाठी (पीसीएम) ३ लाख १४ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी दोन लाख ९५ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रसाठी (पीसीबी) ४ लाख १० हजार ३७७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३ लाख ७९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
या परीक्षेचा निकाल १६ जून रोजी जाहीर करण्यात आला. पीसीबी-पीसीएममध्ये एकूण ३७ विद्यार्थ्यांना १०० टक्के पर्सेंटाइल मिळाले आहे. त्यामध्ये देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी प्रेरणा दिवाण हिने १०० टक्के पर्सेंटाईल मिळविले आहे. यापूर्वीही बारावीच्या परीक्षेत देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तनिशा बोरमणीकर ही राज्यातून प्रथम आली होती. त्यानंतर याच महाविद्यालयाच्या प्रेरणा दिवाण हिने सीईटी परीक्षेत १०० टक्के पर्सेंटाईल मिळवत राज्यातील पहिले येण्याचा मान मिळविला आहे.