औरंगाबाद : ऐन दिवाळीत खाद्यतेलाचे भाव कडाडले असून, लिटरमागे ६ ते १५ रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे. आता फोडणी देणे महागल्याने गृहिणींच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सूर्यफूल तेल ११५, सोयाबीन तेल १०५ रुपये, सरकी तेल १००, तर पामतेल ९५ रुपये. दुकानातील फलकावर खाद्यतेलाचे भाव पाहून ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. ऐन दिवाळसणाच्या तोंडावर खाद्यतेलात भाववाढ झाली आहे. व्यापारी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, सोयाबीन, सरकी व पामतेलाचे भाव पहिल्यांदा १०० पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. दिवाळी असल्याने तेलाची मागणी वाढते. महिनाभरात लिटरमागे १० रुपये वाढ झाली. यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणावर कात्री लागणार आहे. मात्र, शेंगदाणा तेल व करडी तेलात भाववाढ झाली नाही; पण या खाद्यतेलाचे भाव १५० रुपयांपेक्षा अधिक असल्याने ८० टक्के ग्राहक सोयाबीन, सरकी तेल खरेदी करतात. सर्वात स्वस्त तेल म्हणून पामतेल विकत होते; पण या तेलाचे भावही ९५ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. यामुळे ग्राहक सरकी, सोयाबीन तेल खरेदीला पसंती देत आहेत.
अतिपावसाने लांबला तेलबियांचा हंगाम परतीच्या पावसाने यंदा तेल बियांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे सरकी व सोयाबीनचा हंगाम लांबला, तसेच निर्यातही सुरू आहे. त्यात मलेशियाहून पामतेलाची आयात कमी झाली. याचा परिणाम हलक्या प्रतीच्या खाद्यतेलाच्या किमती वाढण्यावर झाला आहे.
मागणी वाढली दिवाळीनंतर बाजारात आवक वाढून सोयाबीन, सरकी व शेंगदाणा, खाद्य तेलाचे भाव कमी होतील. सध्या आवक खूप कमी व सणामुळे ग्राहकांकडून मागणी अधिक वाढल्याने सर्वच तेलाचे भाव सध्या वधारले आहेत. - किशोर मिटकर, खाद्यतेल विक्रेते
नफेखोरीवर लगाम आवश्यक लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे नोकरीवर आहेत त्यांची पगार कपात झाली. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंमध्ये भाववाढ होत असल्यामुळे जगणेच अवघड झाले आहे. राज्य सरकारने नफेखोरीवर लगाम घालणे आवश्यक आहे.- सीमा भालेराव, गृहिणी