लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तरुणांच्या तोडीस तोड तरुणींनीही जल्लोषात केलेले ढोलवादन... हजारो ढोल-ताशांचा दणदणाट...डॉल्बीचा झिंगाट... बँडपथकांच्या मुंगळा व भांगडा गाण्यावर थिरकणारे आबालवृद्ध...सापुतारातील आदिवासींचे लक्षवेधी नृत्य...मुगदल, लाठीकाठीसह पहिलवानांचा मर्दानी खेळाचा थरार... फुलांच्या आकर्षक सजावटीने अधिक खुलून दिसणारा ‘श्री’चा मुखडा... ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी व आतषबाजी... हा ‘झंझावात याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी गणेशभक्तांचा महापूर उसळला होता. जुन्या शहरासह सिडको-हडको, हर्सूल, गजानन महाराज मंदिर परिसर, मुकुंदवाडी, चिकलठाणा, सातारा परिसरातही चैतन्यमयी वातावरणात मंगळवारी ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले.औरंगाबादेत सलग १४ तास अविश्रांत ढोल-ताशांचा दणदणाट सुरूहोता. जुन्या शहरातील लहान-मोठी गणेश मंडळे ढोलपथकांसह विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती. सुमारे एक हजारांपेक्षाही अधिक ढोल-ताशांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. दुपारी १२ वाजता सुरू झालेले ढोलवादन रात्री १२ वाजेच्या ठोक्याला शांत झाले. तत्पूर्वी राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता जिल्हा गणेश महासंघ उत्सव समितीचा रथ गणपती मूर्ती घेऊन पोहोचला होता. ११.३० वाजता विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते संस्थान गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी खा.चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे, महापौर भगवान घडामोडे, उपमहापौर स्मिता घोगरे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, प्रदीप जैस्वाल, डॉ.भागवत कराड, किशनचंद तनवाणी, जगन्नाथ काळे, अंबादास दानवे, अनिल मकरिये, प्रकाश मुगदिया, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. महासंघाचे अध्यक्ष राजू शिंदे तसेच अभिजित देशमुख, ऋषिकेश खैरे यांनी सर्वांचे स्वागत केले. गणेशोत्सव उत्साहात व शांततेत साजरा केल्याबद्दल राजू शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. नगरसेवक नंदकुमार घोडेले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गणेश महासंघाच्या गणेशमूर्तीवर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच मिरवणुकीवर ड्रोनद्वारे गुलाबपाणी शिंपडण्यात आले. सजविलेल्या बैलगाडीतून संस्थान गणपतीची प्रतिमूर्ती आणण्यात आली. दुपारी १२ वाजता लोकप्रतिनिधींनी ही गाडी ओढून मिरवणुकीला सुरुवात केली. संस्थान गणपतीच्या मानाच्या गणपतीमागे गणेश महासंघाचा रथ होता.गणेश महासंघाच्या रथामागे जाधवमंडीतील अष्टविनायक गणेश मंडळाची लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली भव्य मूर्ती होती. राजाबाजार, शहागंज, सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, औरंगपुरामार्गे संस्थान गणपतीची मिरवणूक रात्री ९.४५ वाजता जि. प. मैदानावर पोहोचली. १० वाजता मानाच्या मूर्तीचे विधीवत विसर्जन करण्यात आले.
गणरायाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:15 AM