लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पुष्पाहारांसह गुलालाची मुक्त उधळण... शिस्त, शांतता आणि नियोजन.. ढोल-ताशा, बँजो नी डॉल्बीचा घुमणारा आवाज.. भगवे झेंडे, एकसारखे टी-शर्ट, डोक्याला पट्टी नी लेझीमवर धरलेला ठेका.. अशा उत्साही आणि जल्लोषपूर्ण वातावरणात अकरा दिवस घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मुक्कामी असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला मंगळवारी निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीदरम्यान भक्तांच्या चेहºयावर आनंद, हास्य असले तरी डोळ्यांच्या कडा मात्र पाणावल्याचे चित्र दिसून आले. ‘गणपती बाप्पा मोरया..’ असा जयघोष करून ‘पुढच्या वर्षी लवकर या..!’ असे म्हणत बाप्पाला साद घालण्यात आली.जिल्ह्यात १२४१ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. या व्यतिरिक्त वाड्या, वस्त्यांसह, गल्लोगल्ली, बाल गणेश मंडळांचीही मोठी संख्या आहे. तसेच ३४९ ठिकाणी एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ११ दिवस विविध सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, धार्मिक व इतर कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. भक्तांचा उत्साह अकरा दिवस मोठ्या प्रमाणात दिसून आला. गणेश मंडळांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.मंगळवारी सकाळपासूनच बाल गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पांच्या मिरवणूकीला सुरूवात केली. दुपारपर्यंत छोटे-मोठे गणेश मंडळ एकत्र आले आणि त्यांनी मूर्तीचे विसर्जन केले. दुपारनंतर मोठ्या मिरवणूकांना सुरूवात झाली. गुलाला आणि फुलांची मुक्त उधळण करीत डीजेच्या तालावर भक्तांनी ठेका धरला. रात्री उशिरापर्यंत या मिरवणूका सुरूच होत्या.वाहतूक व्यवस्थेत बदलबीड शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल केला होता. अनेकांना कोणत्या मार्गाने जायचे? कोणता मार्ग कोठे जातो, हेच माहीत नसल्याने अनेक अडचणी आल्या. ठिकठिकाणचे पोलीस वाहनधारकांना रस्ता दाखवित होते.
पुढच्या वर्षी लवकर या..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 1:04 AM