लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : पाचशे मोसंबीची झाडे वाचविण्यासाठी साडेपाच लाख रुपयांचे पाणी विकत घेण्याची दुर्दैवी वेळ सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे लासुर स्टेशन परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. एवढे करून यंदाचे भागले परंतु पुढच्या वर्षीचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे तसाच उभा आहे.
लासुर स्टेशन परिसरातील शेतकर्यांचे हंगामी पिके सोडल्यास मोसंबी फळबाग मुख्य बागायती पीक आहे. मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे या भागातील अनेक मोसंबीच्या बागा जळून जात आहेत. अशा परिस्थितीत बाग वाचवण्यासाठी लाखो रूपये खर्च येत आहे. त्यासाठी काहींनी पाच ते दहा लाख रुपये किमतीचे सहा टायर किंवा दहा टायर ट्रक खरेदी करून त्यावर टँकर बसविले आहे. तर, काहींनी शेततळ्यातील पाणी विकत घेऊन पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
शिरेगाव येथील शेतकरी विश्वनाथ गणपत कुकलारे यांच्याकडे फळांवर असलेले पाचशे मोसंबीचे झाडे आहेत. ती झाडे जतन करण्यासाठी त्यांच्या कडील सर्व पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले. त्यामुळे त्यांनी एका शेतकऱ्याकडील एक एकर क्षेञाच्या शेततळ्यातील पाण्याला तब्बल साडे चार लाख रुपये मोजले. त्यानंतर १ लाखाची पाईपलाईन केली. यामुळे यावर्षी कशीबशी त्यांची बाग जिवंत राहिली आहे.