खुलताबाद (औरंगाबाद ) : येथून जवळच असलेल्या शुलीभंजन येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व सततच्या नापिकीला कंटाळून सोमवारी (दि.१९ ) सकाळी राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. भगवान आसाराम फुलारे (52) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
फुलारे दोन वर्षापासूनची नापिकी व कर्जबाजारीपणाला वैतागले होते. त्यांच्यावर सोसायटीचे एक लाख रूपये तर बँकेचे शेतीकर्ज साडेतीन लाख रूपये त्याचबरोबर इतरांची काही देणी होती. लोकांचा पैशांसाठी सतत तगादा होत असल्याने आज सोमवारी सकाळी त्यांनी राहत्या घराच्या छताला गळफास घेवून आपले जीवन संपविले. तलाठी डी.पी. गोरे, पोलीस जमादार यतीन कुलकर्णी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी शुलीभंजन येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.