पाचोड : पैठण तालुक्यातील कोळीबोडखा गावातील एका शेतकऱ्याने डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर व तो फेडण्याचा एकमेव मार्ग असलेल्या शेतीचे निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान याला कंटाळून विषारी द्रव प्राशन करून जीवन संपविले. बाबासाहेब यशवंतराव काळे (७०), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
पाचोडपासून जवळच असलेल्या कोळीबोडखा येथे बाबासाहेब काळे यांची अडीच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी दोन बँकेकडून कर्ज घेतले आहे. यावर्षी शेतात त्यांनी कपाशी व तुरीची लागवड केलेली असून, या पिकांच्या भरवशावर कर्ज फिटून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल याची त्यांना खात्री होती. पिकेही चांगलीच बहरात आलेली होती. मात्र, महिनाभरापासून परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे बाबासाहेब यांच्या शेतात पाणी साचून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. ज्याच्या भरवशावर त्यांनी स्वप्न पाहिले होते, ती पिकेच नष्ट झाल्याने बाबासाहेब संकटात सापडले. काय करावे, काय नाही याबाबत त्यांना काहीच सुचत नव्हते. शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडायचे, कुठून पैसा आणायचा, या चिंतेने बाबासाहेबांचे अवसान गळाले. शुक्रवारी सकाळीच शेतात जाऊन त्यांनी विषारी द्रव प्राशन केले. ही बाब त्यांच्या पुतण्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तत्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे व डॉ. शिवाजी पवार यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच पाचोड ठाण्याचे सपोनि. गणेश सुरवसे, जमादार किशोर शिंदे व फिरोज बर्डे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
फोटो :
240921\anil mehetre_img-20210924-wa0017_1.jpg
बाबासाहेब यशवंतराव काळे