सोयगाव : शेतातील गोठ्यात बांधलेल्या गुरांना चारापाणी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने घेरल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास जरंडी शिवारात घडली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बिबट्याच्या तावडीतून शेतकºयाची सुटका होताच चवताळलेल्या बिबट्याने वासरावर जोरदार हल्ला चढविला. जरंडी शिवारातील गट क्र. २४१ मधील गोठ्यात जनावरांची देखभाल करण्यासाठी गेलेल्या गोपाल तुकाराम पाटील या शेतकºयाला रात्रीच्या सुमारास घेरून बिबट्याने गराडा घातला. शेतकºयाकडे पाहून बिबट्याने डरकाळ्या फोडल्या. हा आवाज ऐकून जरंडी शिवार हादरले. या डरकाळ्याच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने शेतकºयाला बिबट्याच्या तावडीतून सोडविताच चवताळलेल्या बिबट्याने बाजूलाच असलेल्या वासरावर हल्ला करुन त्याला ठार केले. दिलीप पाटील, गणेश चौधरी, अनिल पाटील, विष्णू पाटील आदींसह ग्रामस्थांनी बिबट्याला शेतातून हुसकावून लावले. या घटनेमुळे रात्रभर जरंडी गाव जागीच होते. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाने मृत वासराचा पंचनामा करून बिबट्याच्या पायांचे माग तपासणीसाठी घेतले आहे.
बिबट्याच्या तावडीतून शेतकरी बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 11:48 PM