छत्रपती संभाजीनगर: लहरी निसर्गावर मात करीत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी कृषी विभागाने गतवर्षी रब्बी हंगामासाठी घेतलेल्या स्पर्धेत गहू उत्पादनात राज्यात अव्वल क्रमांक पटकावला. हारदे यांनी हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन घेतले.
शेतकऱ्यांनी कमी खर्चात पिकाचे अधिक उत्पादन घ्यावे,यासाठी कृषी विभागाकडून विविध प्रयोग केले जातात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीचे अधिकारी करीत असतात. गेल्या काही वर्षापासून कृषी विभागाच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी पीक उत्पादन स्पर्धा घेण्यात आली होती. विविध गहू या सर्वसाधारण कॅटेगिरीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच कृषी विभागाने जाहिर केला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील शेतकरी राजू आसाराम हारदे राज्यात प्रथम आले आहे . तर हेक्टरी ७६क्विटल उत्पादन घेऊन सोमनाथ संपत पेखळे(रा.माडसावंगी,ता.नाशिक ) यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. तर नाशिक जिल्ह्यातीलच वासळी येथील श्रीराम किसन मते हे राज्यात तिसरे आले आहेत. त्यांनी हेक्टरी ७५क्विंटल उत्पादन घेतले. हारदे यांनी हेक्टरी खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील प्रगतीशील शेतकरी राजू आसाराम हारदे यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यांच्याकडे ३५ एकर शेती आहेत. पोक्रा योजनेंतर्गत त्यांनी शेततळी, ठिबक सिंचन, शेडनेट आदी विविध योजनांचा लाभ घेतलेला आहे. यामुळे कृषी विभागाचे अधिकारी त्यांना मार्गदर्शन करीत असतात. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना गहू कॅटेगिरीमध्ये कृषी उत्पादन स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार त्यांनी या स्पर्धेत सहभाग नाेंदविला हाेता.
नियोजनबद्ध लागवड केलीगतवर्षी आम्ही केशवपुष्प ऍग्रो इंडिया कंपनीचे २० किलो बियाणे वापरुन अर्धा एकरवर गहू पेरला होता. पारंपारिक पद्धतीने पेरणी न करता त्यांनी चार इंज अंतरावर दोन कोम्ब याप्रमाणे गव्हाची लावणी केली. तसेच दोन सरीमध्ये १२ इंचाचे अंतर ठेवले. पेरणीपूर्वी पाच ट्रॉली शेणखत टाकले होते. पेरणीनंतर बुरशीनाशक, तणनाशकची प्रत्येकी एक फवारणी केली. एक गोणी डिएपी तर एक गोणी युरीयाची टाकले. प्रती गुंठा ७८ किलो याप्रमाणे २० गुंठे क्षेत्रात१६ क्विंटल उत्पादन झाले.- राजू आसाराम हारदे, शेतकरी