खंडाळा : डोक्यावर कर्जाचा डोंगर व त्या मानाने उत्पन्न कमी, यामुळे शेतकरी कल्याण बाबुराव मगर (४०) हे अडचणीत आले होते. त्यातच खासगी कर्ज देणाऱ्यांनी तगादा लावल्यामुळे ते घर सोडून गेल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
लोणी खुर्द येथील कल्याण मगर हे शेतकरी २७ जानेवारी रोजी सायंकाळी कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले. त्यांचा शोध कुटुंबीयांनी सर्वत्र घेतला. मात्र, ते मिळून आले नाही. या वर्षी शेतात चांंगले उत्पन्न झाले नाही, त्यातच कर्ज देणाऱ्यांनी तगादा लावल्यामुळे पती निघून गेल्याचा आरोप त्यांची पत्नी वंदना कल्याण मगर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्यात २९ जानेवारी रोजी पती हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोइस बेग व शकुल बनकर हे पुढील तपास करीत आहेत.