नांदेड : ६० ते ६५ वर्षावरील अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना लागु करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात बोलतांना सभागृहासमोर दिली़ यामुळे किसान बिरादरीच्या शेतकरी पेन्शन लढ्यास शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते़ बुलढाणाचे आ़विजयराज शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याबाबतचा उपप्रश्न उपस्थित केला होता़ त्यामध्ये त्यांनी ७० टक्के शेतीसाठी एकूण अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी केवळ ५ टक्केच तरतुद शेतीसाठी केल्या जाते़ परंतु शेतीत लागणारे खते बियाणे तसेच मजुरीचे सुद्धा दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पेन्शन योजना लागू करून शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडावा, अशी मागणी त्यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून केली होती़ सद्य परिस्थतीत शेतीसमोरील असलेल्या समस्या मान्य करून अल्पभुधारक शेतकऱ्यांना पेन्शन लागु करण्यात येईल, असे कृषीमंत्र्यांनी मान्य केले आहे़ नांदेड जिल्ह्यातून ‘किसान बिरादरी’ या सामाजिक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे तीस हजारच्या जवळपास शेतकरी, शेतमजुरांना पेन्शनची वैयक्तिक स्वरूपात सामुहिकरित्या मागणी केलेली आहे़ किसान बिरादरीचे अध्यक्ष गोपाळ पाटील इजळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेन्शनच्या मागणीसाठी वारंवार गाव बैठका, सत्याग्रह, धरणे व निवेदने यांच्या माध्यमातून पाठपुरावा मागील ८ महिन्यापासून करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
शेतकरी पेन्शन लढ्यास शासन सकारात्मक
By admin | Published: June 18, 2014 1:13 AM