सोयगाव: अंधाराचा फायदा घेवून झाडावर दबा धरून बसलेल्या अस्वलाने थेट शेतकऱ्याच्या अंगावर उडी मारली. प्रसंगवधान राखून शेतकऱ्याने सतर्कतेमुळे त्याने अस्वलाच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. मात्र, अस्वलाने शेतकऱ्याचा तब्बल तासभर पाठलाग केल्याने तो अर्धमेला झाला. या पाठशिवनीच्या खेळात वेळीच ग्रामस्थ मदतीला धावल्याने शेतकऱ्याची सुटका झाला. ही थरारक घटना रविवारी ( दि. १५ ) रात्री ११ वाजेच्या सुमारास जरंडी शिवारात घडली.
जरंडी शिवारात सुनील सोन्ने(२७) हा शेतकरी रब्बी हंगामातील मका पिकाचे राखण करण्यासाठी आपल्या शेतावर गेला होता. शेतातील एका झाडा खाली आराम करत असताना सुनीलवर अचानक झाडावरील अस्वलाने उडी मारली. परंतु प्रसंगावधान राखत सुनीलने लगेचच तेथून पळ काढला.मात्र अस्वलाने सुनीलचा पाठलाग सुरु केला. यामुळे सुनीलने मदतीसाठी आरडाओरडा करत तेथून पळ काढला. त्याच्या आणि अस्वलाच्या आवाजाने परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अस्वल आणि सुनील यांच्या मधील पाठ शिवणीचा खेळ पाहून ग्रामस्थही थक्क झाले. यानंतर ग्रामस्थांनी अस्वलाला हुसकावून लावले. तब्बल तासभर चालेला पाठशिवणीचा जीवघेणा खेळ थांबला आणि शेतकऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान, अस्वलाने शेतकऱ्याचा पिच्छा सोडला होता. मात्र त्याचा मुक्काम जरंडी आणि निंबायती शिवाराजवळ होता. यामुळे घाबरून गेलेल्या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.