औरंगाबाद : मराठवाड्यात आॅक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामाची वाट लागली. कुठे तरी दोन पैसे हाती येण्याची शक्यता असतानाच शेतकऱ्यांची झोळी पावसाने रिकामी केली. अस्मानी संकट, नैराश्य आणि कर्जबाजारीपणामुळे महिनाभरात ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ५९ पैकी ४६ प्रकरणे चौकशीअभावी प्रलंबित आहेत. यामध्ये १२ प्रकरणे पात्र तर एका प्रकरणाला सरकारी चौकशी समितीने अपात्र ठरविले.
आॅक्टोबरअखेरपर्यंत विभागात ७१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आॅक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणीस आलेली मका, सोयाबीन, डाळी, कापूस पिकांची माती केली. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले. या सरत्या दशकात तीन वर्षे पाऊस बऱ्यापैकी झाला. नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत गेला. कोरडा दुष्काळ आणि आता ओला दुष्काळ यामुळे नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची विवंचना शेतकऱ्यांसमोर आहे. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक १४ आत्महत्या परभणी जिल्ह्यात झाल्या असून, औरंगाबाद ७, जालना ७, हिंगोली २, नांदेड ७, बीड १३, लातूर ६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
३१ आॅक्टोबरपर्यंतची आकडेवारी अशी जिल्हा आत्महत्याऔरंगाबाद १०७जालना ८०परभणी ७२हिंगोली २८नांदेड ९३बीड १५८लातूर ७८उस्मानाबाद ९९एकूण ७१५