उस्मानाबाद : काही बँकांकडून पीक कर्जावर जादा व्याजदर वसूल केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना संबधित बँकेना भेटी देऊन तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी येथील हैैदराबाद बँकेच्या शाखेत तपासणी केली असता या शाखेकडे असलेल्या एकूण १ हजार ६०० पीक कर्ज खात्यांपैकी तब्बल ४०३ खात्यांवर ११.७० टक्के दराने व्याज आकारणी केली गेल्याचे उघड झाले होते. हैदराबाद बँकेच्या १३ शाखांतून सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर ११ टक्के व्याज लावले असल्याचे उघड झाले आहे. यात ४८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.२०१२-१३ या वर्षासाठी बँकांकडून शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निर्णयानुसार व केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणार आहेत, त्या-त्या ठिकाणी बँकांनी ७ ऐवजी शेतकऱ्यांना ६ टक्के व्याज दराने कर्ज द्यावे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रयोजनासाठी १ टक्के व्याज फरकाच्या रकमेचा भार राज्य शासन सोसणार आहे. असे असतानाही काही बँकांकडून जादा व्याजदर आकारणी होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांना बँकांकडून कर्जावर लावण्यात येत असलेल्या व्याजाबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी विविध बँकांची चौकशी सुरू केल्यानंतर स्टेट बँक आॅफ हैैदराबाद शाखेची तपासणी करून याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या अहवालानुसार या शाखेकडे पीक कर्जाचे १ हजार ६०० खाती असून, यापैकी तब्बल ४०३ खात्यांवर ११.७० टक्के या दराने व्याज आकारणी करण्यात आली होती. याच अनुषगांने जिल्ह्यातील जवळपास २०३ बँकेमार्फत पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. या सर्वच बँकेची चौकशी महसूल व कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हैदराबाद बँकेच्या १३ शाखांची तपासणी करुन अधिकाऱ्यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला असून, यात हैदराबाद च्या १३ शाखेत सुमारे २००० हजार शेतकऱ्यांना नियमा पेक्षा पिक कर्जावर जास्त व्याज लावले असून याची रक्कम ४८ लाख रुपये असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तांबे यांनी सांगितले. तसेच पीक कर्जावर लावलेली जादा व्याज दराची रक्कम संबधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याचे तांबे म्हणाले. (प्रतिनिधी) शासनाच्या व्याज अनुदान योजनेनुसार स्टेट बँक आॅफ हैैदराबादच्या उस्मानाबाद शाखेने पीक कर्जावर व्याज आकारणी करून ही रक्कम शासनाकडे व्याज अनुदान योजनेतून मागणी करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता सदर बँक शाखेने ११.७० दराने व्याज आकारणी करुन वसुली केलेली आहे. स्टेट बँक आॅफ हैदराबाद बँकेच्या १३ शाखेचा अहवाल सहकार मंत्री, सहकार सचिव तसेच अन्य विभागांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.उमरगा : शासनाच्या विविध योजनांपासून लाभार्थिंना वंचित ठेवणाऱ्या राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या चौकशीसाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्या बँकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उत्तमराव सबनीस यांनी दिली. पथकामध्ये पी. ए. पाटील, ए. एम. शेंदारकर, के. टी. निंबाळकर, जे.एस. गायकवाड, बी.एम. भांजी, एम.एस. बिडवे, एस.पी. सूर्यवंशी, व्ही.एम. कातपुरे, आर.आर. गायकवाड, एस.व्ही. कोकाटे, डी.बी. कांबळे, एस.डी. लोकरे यांचा समावेश आहे.उमरगा, मुरुम, आलूर, मुळज, केसरजवळगा, बलसूर, तुरोरी, पेठसांगवी, कवठा, येणेगूर, माडज, गुंजोटी, नाईचाकूर, दाळींब, डिग्गी, बेडगा, नारंगवाडी या गावातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकामार्फत शासकीय योजनांची अंमलबजावणी होते का याची तपासणी करण्यात येणार आहे.स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या १३ शाखांनी शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर जादा व्याज दर लावून पैसे वापरले आहेत. मात्र, संबधित बँकानी जादा व्याज लावले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असले तरी बँकेनी वापरलेल्या पैसावर व्याज द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर ४८ लाख रुपये जमा !
By admin | Published: September 13, 2014 11:32 PM