छत्रपती संभाजीनगर : विदेशातील शेती तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी आता दरवर्षी शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याअंतर्गत यावर्षी ५० शेतकऱ्यांना विदेशात अभ्यास दौऱ्यावर पाठविण्यात येणार आहे. कमीत कमी बारावी पास असलेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी तातडीने पासपोर्ट काढून घ्यावा आणि कृषी विभागाकडे अर्ज करावा लागेल.
विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांनी अवगत करून शेती व्यवसायात सुधारणा करावी, यासाठी राज्य सरकारने प्रथमच शेतकऱ्यांसाठी विदेश दौऱ्यांची योजना आणली आहे. या दौऱ्यासाठी प्रति शेतकरी एक लाख रुपयांपर्यंत अनुदान कृषी विभागाकडून दिले जाणार आहे. दरवर्षी राज्यातील सुमारे ४० ते ५० शेतकऱ्यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख यांनी दिली. ते म्हणाले की, या योजनेसाठी शासनाने काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. पासपोर्टधारक आणि कमीत कमी बारावी उत्तीर्ण शेतकरी यासाठी पात्र आहेत.
विदेश दौऱ्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत करा अर्जकृषी विभागाच्या योजनेनुसार विदेशात अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांना अर्ज करता येईल.
१ लाखांपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार अनुदानविदेश दाैऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम (जास्तीत जास्त एक लाख रुपये) शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. महाडीबीटी संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी विदेश प्रवास खर्चाचा तपशील सादर केल्यानंतर त्यांच्या अनुदानाची रक्कम मिळेल.
लॉटरी पद्धतीने निवडले जातील शेतकरीविदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातून केवळ ३ शेतकऱ्यांची या दौऱ्यासाठी निवड केली जाईल.
या आहेत अटीअर्जदार शेतकऱ्यांचा स्वत:चा पासपोर्ट असावा, स्वत:च्या नावे सातबारा असावा, अर्जदार शेतकरी २५ ते ६० वयोगटातील असावा. शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र अर्जासोबत देणे आवश्यक, शेतकरी खासगी अथवा सरकारी नोकरीत असू नये.