औरंगाबाद : जिल्ह्यातील दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी त्यांनी वैजापूर, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यांत पाहणी केली असता शेतकऱ्यांनी पीक विम्यासह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
जिल्ह्यात १६ लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरविना पर्याय राहिलेला नाही. ७०० गावे आणि २६० वाड्या तहानल्यामुळे ग्रामीण भाग वैराण वाळवंटाप्रमाणे झाला आहे. १ हजार ४८ टँकर जिल्ह्यात सुरू आहेत.पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले की, रोजगार हमी योजनेच्या कामांना भेट दिली. चारा छावण्यांची माहिती जाणून घेतली. चारा छावण्या वाढविण्याची आवश्यकता आहे. कारण आहे त्या छावण्यांमध्ये जनावरांची संख्या वाढली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर वाढवावे लागतील. छावण्यांची परिस्थिती चांगली असली तरी संख्या वाढवावी लागेल. दोन ते अडीच हजार जनावरे छावण्यांमध्ये आहेत. आचारसंहिता असली तरी आवश्यक बाबींकडे लक्ष देण्यात यावे, यासाठी प्रशासनाला सूचना केल्या जातील.
टँकर, चारा छावण्यांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पीक विम्याच्या काही तक्रारी आल्या. काही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नसल्याची कैफियत शेतकऱ्यांनी मांडली. त्याबाबत ७ मे रोजी आढावा घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या मागण्या केल्या, त्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या जातील. चारा, टँकर वाढविणे, फेऱ्या वाढविणे, हमी योजनेची कामे वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
आचारसंहिता असली तरी पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था करावीच लागेल. दुष्काळग्रस्त भागांमध्ये ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्याबाबत ताबडतोब निर्णय व्हावेत, यासाठी प्रशासनाला सूचना करण्यात येणार आहेत. पालकमंत्र्यांसह खा.चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आदी पदाधिकाऱ्यांचा पाहणी दौऱ्यात समावेश होता.