छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनील केंद्रेकर यांनी सरकारला मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांचा अहवाल सादर केला होता. आता त्या अहवालावरही धूळ साचली आहे. सरकार त्याबाबत सध्यातरी गप्प आहे. दरम्यान, मराठवाड्यात जुलै, ऑगस्ट महिन्यांत शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. दोन महिन्यांत २०२ तर आठ महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
जून आणि जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामात पेरण्या झाल्या. परंतु जुलैअखेर ते सप्टेंबरच्या ६ तारखेपर्यंत मराठवाड्यात ४४ दिवस पाऊसच नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी हंगामात केलेली गुंतवणूक संकटात आली. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी प्रयत्न कमी पडत आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्यांमध्ये वाढ होत आहे. आठ महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपवली आहे. यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक १८६ तर धाराशिवमध्ये ११३ आत्महत्या झाल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ९५ शेतकऱ्यांनी स्वत:चे जीवन संपवले आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतमालाला कमी भाव, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे.
एक लाख शेतकऱ्यांना होतंय जगणं असह्य?माजी आयुक्त केंद्रेेकर यांच्या काळात झालेल्या पाहणीतून धक्कादायक निष्कर्ष समोर आले होते. मराठवाड्यातील एक लाख शेतकऱ्यांना जगणं असह्य होत असल्याचे अहवालात नमूद होते. तेलंगणा राज्याप्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात एकरी दहा हजार रुपये अर्थसाहाय्य करण्याची शिफारस केंद्रेकर यांनी केली होती. ३ जुलै रोजी केंद्रेकर कार्यमुक्त झाले. त्यानंतर निष्कर्षासह शेतकरी पाहणी अहवाल शासनाकडे दिला होता.
आत्महत्येची कारणे अशी......शेतकऱ्यांची मानसिक, आर्थिक परिस्थिती, मुलांचे विवाह, सावकारी आणि बँकांच्या कर्जबाजारीपणातून आत्महत्येचे विचार शेतकऱ्याच्या मनात येत आहेत. शेतकऱ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. असे अहवालात म्हटले होते. पेरणीपूर्वी उधारीवर खते, बियाणे, औषधीसाठी सावकाराकडून कर्ज घेणे. सावकारांकडून सक्ती होणाऱ्या कर्जवसुलीमुळे आत्महत्या वाढत आहेत.
जुलै व ऑगस्ट महिन्यातील आत्महत्या......औरंगाबाद......३५जालना.........२३परभणी......२०हिंगोली......०५नांदेड.........२१बीड..........५८लातूर.........१७उस्मानाबाद...२३एकूण........२०२