गंगापूर : यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला; परंतु अतिवृष्टीने बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यानंतर सततच्या ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामालाही फटका बसला. आता पिकांना काही अंशी अनुकूल वातावरण आहे. मात्र, महावितरणकडून केल्या जाणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
एकीकडे उद्याेगधंद्यांना चोवीस तास वीजपुरवठा दिला जातो, तर दुसरीकडे मात्र शेतीसाठी दिवसा आठ व रात्री दहा तासच वीजपुरवठा होतो. त्यातही दिवसा कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने पाणी उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे विजेचा लंपडाव सुरू असतो, तर रात्री वीजपुरवठा मिळत असला तरी शेतकरऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दिवसाच्या तुलनेत रात्री थंडी अधिक असते. अंधारात शॉक लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. शिवाय बिबट्यासारख्या जंगली जनावरांच्या भीतीने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत घेऊन पाणी द्यावे लागते. गंगापूर, ढोरेगाव, वरखेड, जामगाव व कानडगाव या गोदा पट्ट्यातील उपकेंद्रांना नेहमी कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी प्रतिकूल हवामानामुळे शेती व शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो. मोठ्या परिश्रमाने शेतकरी यावर मात करतात; परंतु महावितरणच्या लहरीपणाचा फटका वीज पुरवठ्यामुळे पिकांची धूळधाण होऊ पाहत आहे. त्यामुळे यावर्षी पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
कोट :
एका रोहित्रावर मर्यादेपेक्षा जास्त नोंदणी नसलेल्या जोडणी असल्याने वीज वितरणावर थेट परिणाम होतो. त्यामुळे आमची विनंती आहे, की शेतकऱ्यांनी ‘कृषी वीज धोरण-२०२०’ या योजनेंतर्गत नोंदणी करून आपली जोडणी अधिकृत करावी. जेणेकरून वीज मागणीच्या प्रमाणात पुरवठा सुरळीत करण्यास मदत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना पायाभूत सेवा मिळतील. - रवींद्र गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण.
लॉकडाऊनमध्ये सगळं जग थांबलं असताना शेतकऱ्यांनी सगळ्यांना जगविले. त्यामुळे उद्योगासारखी शेतीलादेखील चोवीस तास मुबलक वीज मिळाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील. - भाऊसाहेब शेळके पाटील, शेतकरी.
फोटो : दोन