छत्रपती संभाजीनगर : ट्रान्स्फॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्या जागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे; पण ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे विलंबाने प्राप्त होते. स्थानिक नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर किंवा मंडळस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवा, असे आवाहन महावितरण करीत आहे.
रब्बी हंगाम तसेच जेमतेम पाण्यावर फळबागा जगविताना वीज पुरवठा विस्कळीत होणे त्रासदायक होते. गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्स्फॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्स्फॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरुस्त ट्रान्स्फॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्स्फॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालय स्तरावर दररोज घेण्यात येतो. या मोहिमेला यश आले असून, महावितरणला ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याची खबर मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसांत ट्रान्स्फॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्स्फॉर्मर जळाला आहे, हेच उशिराने समजले तर प्रत्यक्षात वीज पुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीज ग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
चार-चार दिवस वीज गूल...महावितरणला कळवूनही कर्मचारी या पाळीतला आला की पाठवतो, कर्मचारी आला नाही का? असे प्रतिप्रश्न करून सातत्याने ग्राहकांनाच त्रास दिला जातो. वीज बिल भरले का, तुमचा मोबाइल नंबर द्या अशा फाॅर्मालिटी करून घेतात. कर्मचारी आला तर तो फोनही करीत नाही. लाईट आली नाही, परत काय झाले, कधी गेली, अशी फोनवर विचारणा सुरू होते.