सुदामवाडी, बोरसर येथील शेतकऱ्यांची जवळपास दीडशे ते दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन देऊन कोल्ही प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. त्यानुसार अधिकारी आवर्तन सोडण्यासाठी कोल्ही प्रकल्पावर आले होते. ते आल्याचे समजताच या भागातील शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घालत सर्वप्रथम गेट व पाटाची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच अधिकाऱ्यांना दोन तास थांबवून ठेवल्याने सुदामवाडी येथील शेतकऱ्यांना सोडण्यात येणारे आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले नाही. गेट नादुरुस्त असल्याने गेटमधून पूर्वी मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती, परंतु आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत गेटजवळ माती आणून टाकली होती. संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकरी ताराचंद पवार यांनी केला आहे, तर सुदामवाडी भागातील शेतकऱ्यांचे दोनशे हेक्टर क्षेत्रावर पिकाची लागवड केलेली आहे. जर पाणी मिळाले नाही, तर आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याकरिता आम्हाला लवकरात लवकर पाणी सोडण्याची मागणी सुदामवाडीचे सरपंच प्रभाकर सोनवणे यांनी केली आहे.
कोट
माझे कोल्ही प्रकल्पालगत सोळा एकर शेत आहे. पाटबंधारे विभागाला पत्रव्यवहार करूनसुद्धा गेट व पाटाची दुरुस्ती झालेली नाही. पाणी सोडले तर माझ्या शेतातील सर्व पिके नष्ट होतील. त्याकरिता प्रथम दुरुस्ती करावी व नंतर पाणी सोडावे.
किसन पवार, शेतकरी, कोल्ही.
कोट
२००७ पासून पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत गेट व पाटाची दुरुस्ती झाली नाही. यासाठी वरिष्ठ कार्यालयास पत्र पाठविण्यात आले होते; मात्र अंदाजपत्रक मंजूर नसल्याने पाटाची दुरुस्ती होऊ शकली नाही. परंतु पर्यायी व्यवस्था करून पाटाला आवर्तनाचे पाणी सोडण्यात येईल.
- वनगुजरे, अभियंता, सार्वजनिक पाटबंधारे विभाग
फोटो :