शेकटा ( औरंगाबाद ) : येथील औरंगाबाद-जालना महामार्गालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले असून, दुसऱ्या दिवशीही ते सुरू होते. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाकडून लेखी स्वरूपात आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे व शेतकरी मंगळवारी सकाळी ९ वाजता पाण्याच्या टाकीवर चढले. दुसऱ्या दिवशी बुधवारीही हे आंदोलन सुरू होते. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २० ते २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, शेकटा येथील मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सोसायटीच्या ४०० सभासदांना व नवीन सभासदांना तत्काळ कर्ज वाटप करावे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, विहिरींचे पंचनामे, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे, शेती वाहून गेलेली त्याचे पंचनामे अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
यावेळी घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करण्यात आला. मंडळ अधिकारी अनिल शिंदे यांनी भेट देऊन आंदोलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. शासनाने शेतकऱ्यांना मदत द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा, तरच आंदोलन मागे घेतले जाईल, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. या आंदोलनात शेकटा, देमणी-वाहेगाव, गोलटगाव, दरकवाडी, कवडगाव येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून करमाड ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मागण्या मान्य न केल्यास आम्ही सोबत आणलेले विषारी द्रव प्राशन करून टाकीवरून उड्या मारू, असा इशारा सुधाकर शिंदे यांनी दिला आहे.