शेंद्र : खरीप पीकांचा विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु दोन दिवसांपासून विमा भरण्यासाठी वापरण्यात येणारे आॅनलाइन पोर्टल बंद असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. भर पावसात बँक, आॅनलाइन सुविधा केंद्र, किंव्हा शहरातील आॅनलाइन सुविधा केंद्र अशे हेलपाटे करून शेतकरी वैतागले आहे.
२०१८ साठीचा खरीप पीक विमा भरण्यासाठीची मुदत वाढ दिल्यानंतर अंतिम मुदत ३१ जुलै निश्चित करण्यात आली. परंतु दोन दिवसांपासून विमा भरण्यासाठी वापरण्यात येणारे आॅनलाइन पोर्टल बंद असल्याने बँकेत रांगेत उभे राहून शेतकरी वैतागले आहेत.
बँकेचे कर्मचारी हे दिवसभर संकेतस्थळावर प्रयत्न करून सुद्धा विमाभरण्याची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने हवालदील झाले आहेत. बँकेत दिवसभर ताटकळत उभे राहण्यापेक्षा आॅनलाइन सुविधा केंद्रात विमा भरावा म्हणून भर पावसात शेतकरी धावपळ करत आहे. पोर्टल सुरू होत नसल्याने शेकडो शेतकऱ्यांवर विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे खरीप विमा भरण्यासाठी देण्यात आलेली मुदतवाढ फक्त प्रसिद्धी स्टंट असल्याचा आरोप अनेक शेकऱ्यांनी केला आहे. शिवाय आज शेवटचा दिवस असून पोर्टल सुरू झाले नाहीतर बँकेने आॅनलाइन विमा भरून घ्यावा किंवा विमा भरण्यासाठी आणखी मुदत वाढ मिळावी व त्या काळात पोर्टल सुद्धा सुरू करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.