औरंगाबाद : दिवाळी होऊन पंधरा दिवस उलटले तरीही म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली असून, काढणीला आलेला कापूस हातात येईल की नाही, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे.हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
अतिवृष्टीने कापूस, तूर, बाजरी, मका आदी पिके हातची गेली. जी वाचली त्यातही उत्पादनात मोठी घट झाली. त्यातून लागवड खर्चही निघण्याची शक्यता नाही. अशात पुन्हा वातावरण बिघडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाला असून थंडी नसल्याने रबीच्या पिकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, अद्रक, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यातून वाचलेल्या कपाशी पिकाला आता कुठे कापूस फुटला आहे. त्याच्या वेचणीची लगबग सुरू असतानाच वातावरण बदलल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. गत चार-पाच दिवसांपासून किमान तापमानात वाढ होऊन हलकी थंडी गायब झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा पंखे सुरू केले आहेत. अंशतः रोज ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर परिणामयंदाच्या मौसमातील थंडी गेल्या काही दिवसांपासून जाणवायला लागली होती; परंतु तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर, गहू, ज्वारी आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.