- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : सातारा परिसरातील भारत बटालियनजवळील डोंगरात छोटे-मोठे पाझर तलाव आहेत, त्यातील गाळ काढण्याचे काम शासनाने हाती घेतले नाही; परंतु तांड्यावरील एका शेतकरी कुटुंबाने तलावातील गाळ उपसून काढला अन् पाण्याचे पाझर सुरू झाले. त्यामुळे हे कुटुंबीय प्रचंड आनंदी झाले आहे. गाळ उपशाचे काम शासकीय पातळीवर हाती घेतल्यास वन्यजीवांना फायदा होऊ शकतो, यात शंका नाही.
गेल्या तीन वर्षांपासून तलावात खोदकाम करून गाळ उपसा करण्यावर विविध पक्ष, संघटनांच्या वतीने श्रमदान करण्यावर भर दिला जात आहे. त्यास शासनाच्या यंत्रणेने देखील खूप सहकार्य केले; परंतु यंदा कडक उन्हाळा जाणवत असल्याने कोणतीही यंत्रणा सातारा, देवळाईच्या कुशीत असलेल्या तलावाकडे फिरकलेले नाही. त्याचा परिणाम नागरिकांसह तसेच वन्यजीवांवर झाला आहे. पाण्यासाठी भटकंती करण्यावर वन्यजीवांवरही वेळ आलेली आहे. डोंगर भागात असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पाळीव जनावरांना पाणी देणेदेखील जिकरीचे ठरत आहे.
तांड्यावरील एका शेतावर राबणारा शेतकरी सीताराम पवार यांनी टिकाव, फावडे घेऊन तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले. कुटुंबातील चिमुकल्यांनीही त्यांना सहकार्य दिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर निर्माण झाली. गुडघाभर खोदकाम केल्यावर झिऱ्यात पाणी लागले. त्या झिऱ्यातून दीड-दोन तासाला हंडा, दोन हंडे पाणी मिळू लागले. रात्री या झिऱ्यावर डोंगरातील वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असल्याचे पवार यांनी सांगितले.
शासकीय यंत्रणेकडे केली मागणीजिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मनपा आणि भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन आटलेल्या जलस्रोताचे खोलीकरण करण्याची मागणी केली आहे.
शासकीय योजनेचा लाभ सोलापूर महामार्गावर काम करणाऱ्या यंत्रणेचे सहकार्य घेऊन सातारा, देवळाई परिसरातील तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावातील गाळ काढावा, अशी मागणी शेतकरी कांतीलाल साकला, राजू राठोड, गणेश पवार आदींनी केली आहे.