घाटनांद्रा : पेरणीपासून ते पीक हातात येईपर्यंत शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी कायमच मेहनत घ्यावी लागते. पिकांच्या संरक्षणासाठी अनेक शेतकरी नामी शक्कल लढवून वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करतात. असाच अनोखा प्रयोग घाटनांद्रा व धारला शिवारातील शेतकऱ्यांनी केला आहे. मिरची पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बांधावर जुन्या साड्यांचे कुंपण घातले आहे.
घाटनांद्रा व धारला परिसरातील शेतकऱ्यांनी कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारी मिरची लागवड केली आहे. सध्या हे पीक जोमात आले आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांकडून शेतमालात जाऊन उपद्रव घालून नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जागरण करीत पिकांचे संरक्षण करावे लागत आहे. अशातच काही शेतकऱ्यांनी मिरची पिकाला साडीच्या कुंपणाचा आधार घातला आहे. या अनोख्या प्रयोगाने मिरची, भाजीपाल्याचे संरक्षण होत असल्याचे शेतकरी उमेश सोनवणे, रऊफ शेख, संदीप बोरसे, प्रदीप बोरसे, बबन सोनवणे, पंडित काचोळे या शेतकऱ्यांनी सांगितले. साडी कुंपणाचे जुगाड वन्यप्राण्यांना पळवून लावण्यात आणि पिकांना वाचविण्यास उपयुक्त पडले आहे.
090621\datta revnnath joshi_img-20210609-wa0030_1.jpg
मिरची पिकाच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांचे जुगाड