औरंगाबाद : गळीत हंगामात साखर कारखान्याला ऊस देऊन १५ महिने झाले तरी त्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आज (दि. १६ ) साखर आयुक्त कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी अधिकारी नसल्याने शेतकऱ्यांनी खुर्चीला निवेदन देऊन निषेध केला.
पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्यास गाळप हंगामात ऊस दिला होता. मात्र, ऊस उत्पादकांना अद्याप वाढीव बील मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखान्यावर चकरा मारल्या. बिलाची रक्कम मिळत नसल्याने साखर आयुक्त कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून शेतकऱ्यांनी निषेध केला. आंदोलनात मायगाव , वडवली या गावातील शेतकरी उपस्थित आहेत.
शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. यात जिजा उगले , अविनाश मुळे , संतोष काष्टे , विलास गिरगे , सोमनाथ गिरगे , चंद्रकांत गाडे , अशोक गाडे , परमेशवर उगले , देविदास गिरगे , दतू गिरगे , रघुनाथ गोरे , अमोल कांडेकर , किसनराव जाधव , नारायण शिंदे ,रामदास गिरगे , सुदाम जाधव , भोंडे , गणेश शिंदे आसाराम पाचे आदी शेतकऱ्यांचा सहभाग आहे.