उस्मानाबाद : जिल्हाभरात किती शेतकरी आहेत. त्यांनी आतापर्यंत कृषी व संलग्न योजनांचा लाभ घेतला की नाही. त्यांच्यासाठी कोणत्या योजना देता येतील, आदी बाबींची एकत्रित माहिती संकलीत करण्याचे काम कृषी विभागाने हाती घेतले आहे. हा सर्व ‘डाटाबेस’ माहिती आता ‘कृषी मित्र वेबपोर्टल’ वर टाकण्यात येणार आहे. या माहितीचा उपयोग वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांसोबतच विविध शासकीय यंत्रणेना होणार आहे. विविध शासकीय योजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी, या योजनेचा लाभ घेऊन त्याने उन्नती साधावी, गटशेतीच्या माध्यमातून प्रगतीची कास धरावी, यासाठी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकरी गटनिर्मितीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात असून, पहिल्या टप्प्यामध्ये उस्मानाबाद आणि भूम या दोन तालुक्यामध्ये शेतकरी गटांची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर अन्य तालुक्यामध्ये कार्यवाही सुरु केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वेळेवर कर्जपुरवठा करणे, गुणवत्तापूर्ण निविष्ठांचा वेळेवर पुरवठा, मजुरांची उपलब्धता, पेरणीपासून ते काढणीपर्यंत आवश्यक असलेली यंत्रसामुग्री, पीक संरक्षणाची व्यवस्था, ग्रेडींग, पॅकींग आणि बाजारपेठेची माहिती देणे हा या गटशेतीमागचा उद्देश असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. राज्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याने गटशेती उपक्रमात आघाडी घेतली असून, जिल्हाभरात २० हजार ५०० गट स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची माहिती आता ‘कृषिमित्र वेबपोर्टल’वर
By admin | Published: August 27, 2014 1:22 AM