लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : जवळा बाजार परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. परंतु, त्यानंतर परिसरात गत २० ते २२ दिवसांपासून एकही दमदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जवळा बाजारचा परिसर हा बागायती क्षेत्र असून यातील काही हा भाग कोरडवाहू आहे. त्यामुळे या भागात खरीप हंगामात सोयाबीन, हळद, कापूस ही पिके घेतली जातात. तर रबी हंगामात भुईमूग पीक घेतले जाते. दरम्यान, गतवर्षी परिसरात तुरीचे उत्पादन चांगल्या प्रमाणात झाले होते. परंतु, बाजारात तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने तुरीची विक्री करावी लागली होती. त्यामुळे यावर्षी परिसरातील शेतकऱ्यांनी तुरीऐवजी सोयाबीनसह कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्याचप्रमाणे परिसरात हळद व उसाचे क्षेत्रही यावर्षी वाढले आहे. दरम्यान, पेरणीनंतर परिसरात पावसाने जवळपास २० दिवसापासून विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिसरात कधी ढगाळ तर कधी कडाक्याचे ऊन पडत असून त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. त्यामुळे पावसाअभावी कोवळी पिके कोमेजून जात असून शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार पेरणीचे संकट येणार का ? या चिंतेने शेतकरी संकटात सापडला आहे. तर बागायती शेतकरी ठिबक व तुषारच्या मदतीने पिके वाचविण्याची धडपड करीत असून कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसाशिवाय पर्यायच नसल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा
By admin | Published: July 08, 2017 11:40 PM